मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला सैराट हा सिनेमा अखेर प्रदर्शित झालाय. नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि झी स्टोडिओज निर्मित सैराटमध्ये रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर ही फ्रेश जोडी या सिनेमात दिसतेय. काय आहे सैराटची कथा, कसा आहे हा सिनेमा, हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का? काय आहे सिनेमाची ट्रु स्टोरी? टाकूया सिनेमावर एक नजर.


प्रेमकथेला नागराज मंजुळेंचा स्पेशल टच


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैराट ही एक प्रेम कथा आहे. या प्रेम कथेची खासियत म्हणजे याला दिग्दर्शक नागराज मंजुळेचा टच आहे. खरं तर खूप दिवसांनी, कदाचित खूप वर्षांनी अशा प्रकारची प्रेम कहाणी आपल्या भेटीला आलीये. अर्ची आणि परशाची ही लव्ह स्टोरी आहे. आज समाज प्रगती करतोय. जग पुढे चाललंय. विचारसरणी बदलतेय. अनेक जुन्या रुढी परंपरा मागे टाकून प्रगतीच्या दिशेनं प्रत्येक जण वाटचाल करतोय.. अशातच गरीब श्रीमंत, जात- पात, धर्मांच्या नावावर आजही भेद भाव करणारी मानसिकता अस्तित्वात आहे हे वास्तव नाकारता येत नाही. 


कथा एका प्रेमाची


सैराट ही गोष्ट आहे अर्ची आणि परशाची. एका गावात राहणारे हे दोन तरुण एकमेकांच्या प्रेमात पडतात. अर्ची एका श्रीमंत घराण्यात राहणारी तर परशा अत्यंत गरीब घरात जन्मलेला. या दोघांच्या प्रेमाला त्यांच्या परिवाराचा विरोध आहे.  समाजही या दोघांच्या नात्याता स्वीकारत नाही. मग काय घडतं, अर्ची आणि परशा या दोघंच्या निरागस प्रेमाचा विजय होतो? की पराजय. या गोष्टी मी सांगणार नाही कारण त्यासाठी तुम्हाला सैराट हा सिनेमा पहावा लागेल.


दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या आजवरच्या सिनेमातून कायम आउट ऑफ द बॉक्स विषय मांडलेत.. सैराट या सिनेमाचा विषय मात्र खुपच सिंपल प्रेम कहाणी आहे, मात्र मी जसं आधी म्हटलं, या सिनेमाला नागराज मंजुळे टच आहे.. सुरुवातीपासून शेवटापर्यंत सिनेमाला देण्यात आलेली ट्रीटमेन्ट, सिनेमातले संवाद, लॉकेशन्स, कलाकार, सैराटचा तो ग्रामीण टच या सगळ्या गोष्टी मनाला भिडून जातात.. रियल वाटतात.. आपण खरोखरच त्या गावात आल्याचा फील हा सिनेमा देउन जातो.. ब-याच वर्षांनी एक साधी, निरागस प्रेम कहाणी सैराटच्या निमीत्तानं पहायला मिळतेय.


अजय-अतुलची 'संगीत'साथ


यात सोने पे सुहागा म्हणजे संगीतकार अजय-अतुल या जोडीचं संगीत. एकीकडे याड लागलं हे गाणं तुम्हाला प्रेमात पडायला लावतं. एका वेगळ्याच जगात घेउन जातं. तर दुसरीकडे झिंग झिंग झिंगाट हे गाणं तुम्हाला ठेका धरायला लावतं.


नवखे कलाकार मात्र तरीही...
विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर या दोघांचा. या दोघांचाही हा पहिलाच सिनेमा पण सैराटमधला यांचा अभिनय पाहता हा यांचा डेब्यू सिनेमा आहे, या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. 


रिंकूचा बिनधास्त अंदाज


अभिनेत्री रिंकू राजगुरुनं साकारलेली अल्लड आर्ची ही व्यक्तिरेखा भाव खाउन जाते. तिचं बुलेट चालवणं, ट्रॅक्टर चालवणं, परशाला डोळ्यात डोळे घालून आय लव्ह यू म्हण्णं, तिचा डॅशिंग अंदाज, या सगळ्या गोष्टी तिनं अप्रतिमरित्या पार पाडल्या आहेत. एक फ्रेश चेहरा, बोलके डोळे, चेह-यातले भाव, तिची डायलॉग डिलीवरी या एलिमेन्ट्समुळे ती बिग स्क्रीनवर कमाल वाटते. 


आकाशचा सहजसुंदर अभिनय


दुसरीकडे परशा ही व्यक्तिरेखा साकारणा-या अभिनेता आकाश ठोसर यांन सुद्धा त्याची भूमिका उत्तम पार पाडली आहे. आकाशच्या निमित्तानं एक फ्रेश चेहरा इंडस्ट्रीला मिळालाय. याचबरोबर विशेष उल्लेख करावासा वाटतो अभिनेता तानाजी गालगुंडे आणि अरबाज शेख या दोन कलाकारांचा. परश्याचं जितकं प्रेम अर्चीवर असतं, तितकंच प्रेम या दोघांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांचं त्यांच्या मित्रावर अर्थातच परश्यावर असतं. या दोघांनीही आपआपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत.


कहानींमे ट्विस्ट


सैराट या सिनेमाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. सिनेमातले अनेक पैलू इथे मांडले, तरी एक प्रश्न तुम्हाला पडला असेल. नागराज मंजुळेचा सिनेमा आणि ती ही एक सिंपल साधी लव्ह स्टोरी? तर याचं उत्तर तुम्हाला सिनेमाच्या शेवटी मिळेल.. सिनेमाचा क्लायमॅक्स वेड लावतो, ज्या पद्धीनं हा क्यायमॅक्स शुट झालाय. त्यासाठी दिग्दर्शक नागराज मंजुळेला हॅट्स ऑफ आहे.


लांबवलेली पटकथा


सैराटचा उत्तरार्ध हा आणखी इंटरेस्टिंग वाटतो. पूर्वाधही छान झालाय मात्र सिनेमाची लेन्थ जवळ जवळ तीन तास इतकी आहे. जर ते आणखी कमी करता आली असती तर सिनेमा आणखी रंजक झाला असता.. विनाकारण लांबलेल्या पटकथेमुळे सिनेमाचा फ्लो काही ठिकाणी भरकटलेला वाटतो. सैराट पाहिल्यानंतर तुम्हाला एक दुजे के लिए किंवा इशकझादे या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, पण त्या सिनेमांमध्ये आणि सैराटमध्ये बराच फरक आहे. फॅन्ड्री या सिनेमाप्रमाणे सैराटमध्ये देखील तुम्हाला तोच रॉनेस दिसून येतो.


किती स्टार्स


सैराट या सिनेमाच्या निमित्तानं अनेक वर्षांनी एक निरागस प्रेम कहाणी आपल्या भेटीला आली आहे. प्रेम करावं तर परशा आणि अर्ची सारखं, मित्र असावे तर प्रदीप आणि साल्या सारखे. हे सगळे फॅक्टर्स पाहता या सिनेमाला मिळतायत ३.५ स्टार्स.