अजित मांढरे, मुंबई : संजय दत्तने जेलमध्ये नक्की शिक्षा भोगली का? त्याला कधी आणि का पॅरोल, फर्लो मिळाला? अशी माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलीय. मात्र, या माहितीचं उत्तर हवं असल्यास संजय दत्तची परवानगी घेऊन देण्यात येईल, असं विचित्र उत्तर जेल प्रशासनाने दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरटीआय कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी संजय दत्तबाबत अनेकदा माहिती अधिकारा अंतर्गत विविध अर्ज केले. पण जेल प्रशासनाने कायदे आणि नियम सांगत माहिती देण्यास नकार दिला. संजय दत्त विरोधात अनेक याचिका केल्या असल्याने माहिती मिळवण्याआधी संजय दत्तकडून परवानगी आणा, असं अजब उत्तर सरकारी यंत्रणांनी प्रदीप भालेकर यांना दिलंय. 


संजय दत्त जेलमध्ये कोणत्या फॅक्ट्रीत काम करत होता? तो काम करत असतानाचं सीसीटीव्ही फुटेज, संजय दत्तने कोणत्या दिवसापासून शिक्षा भोगण्यास सुरूवात केली? कोणत्या दिवसापर्यंत शिक्षा भोगली? संजय दत्तला किती वेळा पॅरोल आणि फर्लो मिळाला? संजय दत्तने दोन दिवस अतिरिक्त शिक्षा भोगली त्याबाबत काय कारवाई झाली? पॅरोल आणि फर्लोसाठी इतर कैद्यांचे अर्ज असतानाही संजय दत्तला प्राधान्य का मिळाले? जेलमधील संजय दत्तच्या वर्तणुकीची नोंद, संजय दत्तनंतर सुटलेल्या कैद्यांची माहिती अशी भालेकर यांनी मागवली होती. पण ही माहिती देता येत नसल्याने संजय दत्तचं परवानगी पत्र घेऊन या असं उत्तर सरकारी यंत्रणांनी दिलं.


संजय दत्तबाबत सरकारी माहिती हवी असल्यास त्याची परवानगी घेऊन या, असं उत्तर दिल्याने सरकारी यंत्रणांनी संजय दत्तसाठी कशा पायघड्या घातल्या होत्या त्याचा जणू लेखी पुरावाच ठरल्या आहेत.