सिनेमा : सरकार ३


दिग्दर्शक : राम गोपाल वर्मा


कथा : निलेश गिरकर


कलाकार : अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, मनोज वाजपाई, अमित साध, यामी गौतम, रोनित रॉय 


वेळ : १३२ मिनिटे


मुंबई : 'बाहुबली द कन्क्लूजन' हा सिेनेमा रिलीज झाल्यानंतर, त्या सिनेमाची लोकप्रियता आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता, गेल्या आठवड्यात एकही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. परंतु आज बिग स्क्रिनवर बिग बी अमिताभ बच्चनचा दीर्घकाळ प्रतिक्षेत असलेला 'सरकार ३' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या सिनेमात अमिताभ बच्चनसोबतच जॅकी श्रॉफ, मनोज बाजपाई, यामी गौतम, रोनित रॉज अशी कलाकारांची भली मोठी फौज पहायला मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००५ साली निर्माता दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी हॉलिवूडच्या प्रसिद्ध 'गॉडफादर' या सिनेमाची प्रेरणा घेत 'सरकार' हा सिनेमा बनवला होता. या सिनेमाचं बऱ्यापैंकी कौतुक झालं. त्यानंतर २००८ साली 'सरकार राज' हा सिनेमा तयार केला. या सिनेमानंही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली... आणि आता जवळपास नऊ वर्षांनी याच सीरीजचा तिसरा सिक्वल 'सरकार ३' आपल्या भेटीला आलाय.


अमिताभ बच्चननं साकारलेला या कहाणीतला 'सरकार' अर्थातच सुभाष नागरे याचा नातू शिवाजी नागरे अनुच्या प्रेमात आहे. सरकार सुभाष नागरेकडून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अनू आपल्या बॉयफ्रेन्ड शिवाजीची मदत घेण्याचा प्रयत्न करते. यानंतर सरकार सुभाष नागरेच्या अगदी जवळचे गोकुळ आणि गोरख हे कॅरेक्टर्स असं काहीतरी करतात की या संपूर्ण कथेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येतात. नेता 'देशपांडे' ही व्यक्तिरेखा साकारली आहे मनोज वाजपाईनं आणि 'वाल्या' अर्थातच जॅकी श्रॉफ सिनेमाच्या कथेला आणखी हातभार लावतात. 


'सरकार' आणि 'सरकार राज'च्या तुलनेत या 'सरकार ३' या सिनेमाची कथा तुम्हाला खिळवून ठेवण्यात कमी पडते. याची अनेक कारणं आहेत. सिनेमाची कहाणी प्रेडिक्टेबल आहे. पुढे काय होणार? याचा अंदाज तुम्ही सहज लावू शकता. त्यामुळे सिनेमाची पकड कमजोर होते. खरंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी कथेप्रमाणे पटकथेचीही काळजी घ्यायला हवी होती, जे या सिनेमाच्या बाबतीत घडताना दिसत नाहीय.


'सरकार' आणि 'सरकार राज' या दोन्ही सिनेमांचं बॅकग्राउंड स्कोर आणि कॅमरावर्क कमाल झाला होता. मात्र 'सरकार ३' या सिनेमातल्या या दोन्ही एलिमेन्ट्स खूपच लाऊड वाटतात. 'सरकार ३' हा एक मल्टिस्टारर सिनेमा असून, सिनेमात तब्बल आठ ते नऊ कलाकार महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. त्यामुळे ही पात्र एकमेकांना कॉम्प्लिमेन्ट करताना दिसत नाही. सिनेमाची मांडणी फसलीय, असं म्हणता येईल.


बिग बी अमिताभ बच्चन यांचा स्क्रिन प्रेसेन्स कमाल वाटतोय. 'सरकार' आणि 'सरकार राज'प्रमाणे या सिनेमातला अभिनयही लाजवाब आहे. या व्यक्तिरेखेसाठी बिग बी अमिताभ यांनी आपल्या आवाजातही परिवर्तन केल्याचं कळतंय. अमिताभसोबतच मनोज वाजपाई, जॅकी श्रॉफ, रोनित रॉय, रोहिणी हट्टंगडी, यामी गौतम या कलाकारांनी जबदस्त अभिनय केलाय. 


सिनेमातचं संगीत आणि बॅकग्राउंड स्कोर पाहता फार नाविन्य काही दिसत नाही. जवळपास ३० ते ४० कोटींमध्ये बनलेला हा सिनेमा १५०० स्क्रिन्सवर रिलीज झालाय. 'सरकार ३' या सिनेमाला, बाहुबली द कंक्लुजन हा सिनेमा रिलीजच्या दोन आठवड्यानंतरही टक्कर देणार यात शंका नाही. 


तुम्हा जर अमिताभ बच्चन आणि रामगोपाल वर्मांचे खूप मोठे चाहते आहात तर एकदा हा सिनेमा पहायला हरकत नाही. तेव्हा 'सरकार ३' या सिनेमातले हे सगळे फॅक्टर्स पाहता आम्ही या सिनेमाला देतोय २ स्टार्स...