सिन्हा कुटुंबाला दु:खद धक्का... नातेवाईकाची आत्महत्या!
आपल्या एका नातेवाईक महिलेच्या आत्महत्येनं सिन्हा कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. शत्रुघ्न सिन्हा यांची वहिनी शीला सिन्हा यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय.
गुडगाव : आपल्या एका नातेवाईक महिलेच्या आत्महत्येनं सिन्हा कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. शत्रुघ्न सिन्हा यांची वहिनी शीला सिन्हा यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय.
महत्त्वाचं म्हणजे, गेल्या सात दिवसांपासून शीला यांचं शव त्यांच्याच घरात पडून होतं. शेजाऱ्यांना संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना पाचारण केलं. गुरुवारी, पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर शीला यांचं शव पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडलं. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये, शीला यांनी सात दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचं उघड झालंय.
शीला सिन्हा यांची पार्श्वभूमी...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६९ वर्षीय शीला सिन्हा या अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या भावाच्या पत्नी होत्या. दोन दशकांपूर्वी त्यांचा पतीशी घटस्फोट झाला होता.
शीला यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्या गुडगावच्या आपल्या घरी एकट्या राहत होत्या. त्यांचा मुलगा लंडनमध्ये डॉक्टर आहे. त्याचं स्वत:चं हॉस्पीटल आहे. तर मुलगी गुजरातमध्ये राहतेय.
मानसिकरित्या आजारी...
शीला गेल्या काही वर्षांपासून मानसिकरित्या आजारी होत्या. त्या आपल्या मुलाचा-मुलीचा फोनही घेत नव्हत्या. आठवड्यातून एकदा त्या घराबाहेर पडत असत. यावेळी आपली गाडीही त्याच चालवत असत. शेजाऱ्यांशीही त्या क्वचितच संवाद साधायच्या.
पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही.