मुंबई : बॉलिवूडमधील दबंग खान सलमान आणि किंग खान शाहरुख एखाद्या चित्रपटात एकत्र दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण, सध्या दोघांमधील मैत्री एका वेगळ्याच थराला पोहोचली आहे. या नुकताच एक प्रत्यय आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान त्याचा आगामी चित्रपट 'सुल्तान'च्या गाण्याचं शूटिंग करण्यात व्यस्त होता. तेव्हा तिथे एक खास पाहुणा अचानक आला. हा पाहुणा दुसरा तिसरा कोणी नसून चक्क शाहरुख खान होता. 


सलमानचं शूटिंग ज्या ठिकाणी सुरू होतं त्याजवळच शाहरुख शूटिंगसाठी आला होता. तिथे आल्यावर त्याला आपल्या जवळच सलमानही शूटिंग करतोय असं समजलं. म्हणून तो लगेचच सुल्तानच्या सेटवर गेला. तिथे शूटिंग करत असलेल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 



एकमेकांना भेटल्यावर ते काही काळ छान गप्पा मारण्यात व्यस्त होते. दोघांनी काही विनोदही केले. सलमानने शाहरुखला 'सुल्तान'मधील काही सीन्सपण दाखवले आणि त्याला शाहरुखच्या आगामी 'फॅन'चा ट्रेलरही खूप आवडल्याचे सांगितले. 


असं असलं तरी येत्या रमझान ईदला शाहरुख आणि सलमान बॉक्स ऑफिसवर भिडणार आहेत. शाहरुखचा 'रईस' आणि सलमानचा 'सुल्तान' एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे आता जरी मैत्रीचे गोडवे गात असले तरी ईदला मात्र त्यांच्यात 'काँटे की टक्कर' होणार यात काही वाद नाही. त्यांची ही दिलजमाई आणखी किती काळ टिकते हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.