मुंबई : राजामौलीच्या बाहुबलीने बॉक्स ऑफिसवर दाणादाण उडवली होती. 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं?' हा सर्वात मोठा प्रश्न तेव्हापासून चाहत्यांसमोर आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचं चित्रीकरण सुरू झालंय. पण, आता या दुसऱ्या भागाची कहाणी लीक झाल्याच्या बातम्या येतायत आणि या कहाणीत कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाचंही उत्तर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कहाणीनुसार चित्रपटाची सुरुवात तिथेच सुरू होते जिथे पहिल्या भागाची कहाणी संपते. कटप्पा शिवाला सांगत असतो की त्याने बाहुबलीची हत्या का केली. कटप्पाच्या पूर्वजांनी दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या घराण्यात जन्मलेले सर्वजण राजघराण्याचे गुलाम असतील. 


कटप्पा शिवाला सांगतो की जेव्हा कालकेयाशी युद्ध होते तेव्हा राजमाता म्हणते की जो कालकेयाचं मुंडकं कलम करुन आणेल तो माहिष्मती साम्राज्याचा राजा बनेल. युद्धादरम्यान राजमाता भल्लालदेव आणि बाहुबली यांच्या क्षमतेची पारखही करते. युद्धात कालकेय मारला जातो. युद्धात बाहुबली साम्राज्यातील लोकांचाही विचार करतो आणि त्यांचा जीव वाचवतो. त्याच्या या क्षमतेवर प्रभावित होऊन राजमाता त्याला राजा घोषित करते. 


पण, राजा झाल्यावर बाहुबलीला एका दुसऱ्या साम्राज्यातील देवसेना नावाच्या मुलीसोबत प्रेम होतं. हे माहित पडल्यावर राजमाता आदेश देते की जो देवसेनेसोबत विवाह करेल त्याला साम्राज्याचा त्याग करावा लागेल. बाहुबली हा आदेश मान्य करतो आणि माहिष्मती साम्राज्य सोडून जातो. 


बाहुबली साम्राज्य सोडून गेल्यावर आपल्या वडिलांच्या हत्येचा सूड घ्यायला कालकेयचा पुत्र माहिष्मती साम्राज्यावर आक्रमण करतो. राज्य सोडून गेलेल्या बाहुबलीला जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा तो साम्राज्यात परत येतो. बाहुबली परतल्यावर भल्लालदेव मात्र चिंतेत पडतो. राजमाताने जर का बाहुबलीला माफ केले तर आपले सिंहासन जाऊ शकते याची काळजी त्याला सतत वाटत राहते. म्हणून भल्लालदेव कटप्पाला बाहुबलीला मारण्याचे आदेश देतो. राजसिंहासनाचा गुलाम असल्याने कटप्पा बाहुबलीला युद्धादरम्यान मारुन टाकतो.


हे जेव्हा समजते तेव्हा चित्रपटात मध्यांतर होतो. त्यानंतरची कहाणी मात्र टिपिकल बॉलिवूड स्टाईलची असण्याची शक्यता आहे. त्यात बाहुबलीचा पुत्र शिव म्हणजेच प्रभास भल्लालदेवाला धडा शिकवतो आणि त्याच्या तावडीतून माहिष्मती साम्राज्याची मुक्तता करतो.


ही कहाणी आता किती प्रमाणात खरी ठरते, हे जाणून घेणे औत्सुक्याचे आहे.