रांगड्या जीवांची भाबडी प्रेमकथा `तुझ्यात जीव रंगला`
कोल्हापुरी माणूस म्हटलं की डोळ्यासमोर येतो तांबड्या मातीतला रांगडा गडी... रांगडेपणा हा इथल्या मातीचा आणि या मातीतील माणसांचा स्वभावधर्मच... पण, या रांगडेपणालाही प्रेमाची, मायेची एक नाजुकशी झालर असते ज्यामुळेच इथल्या लोकांचा वेगळेपणा नजरेत भरतो. अशाच रांगडेपणातील प्रेमाची एक अलवार गोष्ट बघायला मिळणार आहे `झी मराठी`च्या आगामी `तुझ्यात जीव रंगला` या मालिकेतून... येत्या ३ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
मुंबई : कोल्हापुरी माणूस म्हटलं की डोळ्यासमोर येतो तांबड्या मातीतला रांगडा गडी... रांगडेपणा हा इथल्या मातीचा आणि या मातीतील माणसांचा स्वभावधर्मच... पण, या रांगडेपणालाही प्रेमाची, मायेची एक नाजुकशी झालर असते ज्यामुळेच इथल्या लोकांचा वेगळेपणा नजरेत भरतो. अशाच रांगडेपणातील प्रेमाची एक अलवार गोष्ट बघायला मिळणार आहे 'झी मराठी'च्या आगामी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून... येत्या ३ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेची कथा आहे राणा आणि अंजलीच्या प्रेमाची... कोल्हापूरजवळच्या छोट्याशा गावात राहणारा राणा गायकवाड हा तालमीतला पहिलवान... तालमीचा आखाडा हेच त्याचं जीवन आणि कुस्ती हेच त्याचं प्रेम. राणाचे वडील प्रतापराव गायकवाड राजकारणी परंतु समाजसेवी वृत्तीचे... गावच्या भल्यासाठी जे जे करता येईल ते सर्व काही करणारे... आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेल्या राणाकडे शेतीवाडीचा मोठा पसारा आहे. आखाडा आणि शेतीतच जास्त वेळ घालवणाऱ्या राणाचं शिक्षणही जेमतेमच झालेलं... शरीराने जरी रांगडा असला तरी मनाने तो अतिशय हळवा आहे.
गावातील प्रत्येकाच्या उपयोगी येणारा, सर्वांना मदत करणारा राणा मात्र मुलींच्या बाबतीत अतिशय लाजरा आहे. सच्चा पहिलवान तोच जो ब्रह्मचर्याचे पालन करतो आणि मुलींपासून दूर राहतो... तशी शिकवण लहानपणापासूनच त्याच्या मनावर बिंबवली गेली आहे त्यामुळे तो मुलींपासून कायमच अंतर राखून वागतो... अशा राणाची भेट अंजलीशी होते.
वडिलांच्या नोकरीतील बदलीमुळे त्या गावात आलेली अंजली ही एक सुशिक्षित मुलगी आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग गावातील मुलांनाही व्हावा म्हणून ती गावातील शाळेत शिक्षिकेची नोकरी करत आहे. राणा आणि अंजली दोघेही परस्परभिन्न स्वभावाचे... अंजली बोलघेवडी तर राणा भिडस्त स्वभावाचा... ती उच्चशिक्षित तर हा कमी शिकलेला... ती सर्वांशी मिळून मिसळून वागणारी तर राणा आपल्याच विश्वात रमणारा... हेच वेगळेपण या दोघांना एकमेकांकडे आकर्षित करण्यास कारणीभूत ठरतं. या मालिकेच्या निमित्तानं प्रथमच अस्सल ग्रामीण बाजाची आणि हिरव्यागर्द शेताच्या सोबतीने बहरणारी आगळी वेगळी प्रेमकथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
राणा हा गावातील प्रत्येक माणसाच्या जवळचा आहे. घरची श्रीमंती असूनही कायम जमिनीवर राहणारा, साधा भोळा राणा अंजलीला भावतो आणि ती तिच्या प्रेमात पडते. मुलगीच काय तिच्या सावलीपासूनही दूर पळणाऱ्या राणालाही अंजली आवडायला लागते. त्या दोघांच्या याच प्रेमाची कथा म्हणजे 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका... राणाच्या आयुष्यात अंजलीच्या येण्याने गायकवाड परिवारात काय बदल होतील? राणाचं आणि अंजलीचं प्रेम घरातील लोक स्वीकरातील का? याचीही एक समांतर गोष्ट या मालिकेतून बघायला मिळणार आहे.
या मालिकेत राणाच्या भूमिकेत हार्दिक जोशी तर अंजलीच्या रुपात अक्षया देवधर ही नवोदित जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या मालिकेची कथा, पटकथा सुबोध खानोलकर यांची तर संवाद तेजेश घाडगे यांचे आहेत. स्मृती सुशिलकुमार शिंदे यांच्या सोबो फिल्म्स प्रा. लि. या संस्थेने मालिकेची निर्मिती केली असून निरंजन पत्की हे मालिकेचे दिग्दर्शक आहेत.
रांगड्या जीवांची भाबडी प्रेमकथा असलेली 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका येत्या ३ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वा. झी मराठीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येईल.