`उडता पंजाब` रिलीजचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला
`उडता पंजाब` या चित्रपटाच्या रिलीजच्या संदर्भातला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत राखून ठेवलाय.
मुंबई : 'उडता पंजाब' या चित्रपटाच्या रिलीजच्या संदर्भातला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत राखून ठेवलाय.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या काही सीन काढण्यास तत्वतः मान्यता दिलीय. पण सगळ्या सूचना मान्य करण्यास निर्माते तयार नाही. याप्रकरणी हायकोर्टात आज सेन्सॉर बोर्डाच्या वकीलांनी चित्रपटातले अनेक संवाद अत्यंत अश्लील असल्याचं म्हटलंय. त्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांच्या वकीलांनी ही युक्तीवाद केला. याप्रकरणी सुनावणी संपली असून कोर्टानं निर्णय सोमवारपर्यंत राखून ठेवलाय.
मुंबई उच्च न्यायालयाने उडता पंजाबप्रकरणी सेन्सॉर बोर्डाच्या दृष्यकपातीवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. उडता पंजाब या सिनेमातल्या ८९ दृष्यांना कात्री लावतानाच सिनेमाच्या नावातील पंजाब काढण्यासारखी सूचनाही सेन्सॉर बोर्डाने केली होती. यावेळी खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सेन्सॉरबोर्डाच्यावतीने चित्रपटातील भाषा अत्यंत शिवराळ असल्याचे सांगण्यात आले. यावर भाषा हा चित्रपटाचा अंतर्गत विषय असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.