मुंबई : केंद्र सरकारने मागच्या आठवड्यात पाचशे आणि हजारच्या चलनात असलेल्या नोटांवर बंदी आणली. त्याचा परिणाम नाटक आणि सिनेक्षेत्रावरही दिसून आला... मात्र, आर्थिक परिक्षेच्या काळातही 'व्हेंटिलेटर' या मराठी सिनेमानं ११ दिवसांत ११ कोटींची कमाई केलीय.


प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्थिक अडचणींचा आणि काटकसरीच्या काळातही प्रियांका चोप्रा निर्मित 'व्हेंटिलेटर' चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणाऱ्या आणि सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेल्या व्हेंटिलेटरने दुसऱ्या आठवड्यातही आपली घोडदौड कायम ठेवली. 


काही ठिकाणी सिंगल स्क्रिन चित्रपटगृहात थोडासा परिणाम झाला असला तरी त्याची कसर मल्टीप्लेक्समध्ये भरुन निघतेय. ऑनलाईन बुकींग, नेट बॅंकींग आणि प्लास्टिक मनी इत्यादी पर्यायांचा वापर करुन प्रेक्षक चित्रपटाचा आनंद घेत आहेत हे विशेष. प्रेक्षकांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळेच व्हेंटिलेटरने मागील ११ दिवसांत ११ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली.


'प्रेक्षकांनी स्वत:ला जोडून घेतलं'


या प्रतिसादाबद्दल चित्रपट निर्मात्या डॉ. मधु चोप्रा यांनी प्रेक्षकांचे आभार मानलेत. 'व्हेंटिलेटरला मिळणारा प्रतिसाद हा आमचा आत्मविश्वास वाढवणारा आणि मनात अभिमानाची भावना निर्माण करणारा आहे. मानवी भावना आणि कुटुंब व्यवस्थेवर सकारात्मक भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षक भावूक तर होतच आहेत शिवाय त्यामध्ये स्वतःचा शोध घेत आहेत... प्रेक्षकांनी अशा प्रकारे चित्रपटाशी स्वतःला जोडून घेणं ही आमच्यासाठी निश्चितच आनंदाची बाब आहे'


चित्रपटाच्या या यशाबद्दल दिग्दर्शक राजेश मापुसकर म्हणाले की, 'देशातील जनता एका आर्थिक विवंचनेतून जात असतांना आपलं यश साजरं करणं हे थोडसं संयुक्तिक ठरणार नाही परंतु याही परिस्थितीत ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे.


हरहुन्नरी कलाकारांचा मेळा


आशुतोष गोवारीकर, सतीश आळेकर जितेंद्र जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुलभा आर्या, निखिल रत्नपारखी यांसारख्या अनुभवी आणि हरहुन्नरी अभिनेत्यांबरोबरच जवळपास ७० च्या वर कलाकारांच्या बहारदार अभिनयाने सजलेल्या व्हेंटिलेटर चित्रपटाची निर्मिती प्रियांका चोप्रा आणि डॉ. मधु चोप्रा यांच्या पर्पल पेबल्सने केली असून मॅगीज पिक्चर्सने सहनिर्मिती केली आहे तर वितरण 'झी स्टुडिओज'ने केलं आहे. ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस आलेला हा चित्रपट सध्या २५८ चित्रपटगृहांतून ४१६५ शोद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.