मुंबई : 'या रे या सारे या' म्हणत मराठी प्रेक्षकांना आपलसं करणारा आणि सर्वच स्तरातून गौरविला गेलेला नवाकोरा मराठी चित्रपट व्हेंटिलेटर झी मराठीच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशुतोष गोवारीकर, सुकन्या कुलकर्णी, जितेंद्र जोशी, सुलभा आर्य, उषा नाडकर्णी आणि सतीश आळेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने आणि राजेश मापुस्कर यांच्या दिग्दर्शनाने सजलेला हा चित्रपट येत्या २९ जानेवारीला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.


केवळ बॉलिवुडच नाही तर हॉलिवुडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राने या चित्रपटाची निर्मिती केली होती तर हिंदीमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सहाय्यक दिग्दर्शन करत ‘फेरारी की सवारी’ सारखा वेगळ्या विषयावरचा चित्रपट देणारे दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी याद्वारे मराठी दिग्दर्शनात पदार्पण केले होते.


याशिवाय हिंदीमध्ये दिग्दर्शनात आपली वेगळी ओळख निर्माण केलेले आशुतोष गोवारीकर यांच १८ वर्षांनी मराठीत पुनरागमन अशी एक ना अनेक वैशिष्ट्ये या चित्रपटाशी जोडली गेली होती. चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या भरभरुन प्रतिसादाच्या आधारे त्याने तिकीटबारीवर कोटी कोटी कमाईची उड्डाणेही घेतली. विशेष म्हणजे हजार-पाचशेच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतरही चित्रपटाने दहा आठवड्यापर्यंत आपली घौडदौड कायम ठेवली. 


मानवी नात्यांचे आणि भावभावनांचे विविध पदर या चित्रपटाने उलगडले आणि बाप मुलाच्या नात्यावर एक वेगळा प्रकाशही टाकला. कोकणातील कामेरकर कुटुंबियांची ही गोष्ट. तब्बल ७८ कलाकारांच्या गोतावळ्यात फुललेल्या कथेने प्रेक्षकांची मने जिंकली. 


कामेरकर कुटुंबियांचे प्रमुख गजू काकांना आजारपणात व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं आणि त्यांना बघायला येण्यासाठी गावाकडून नातेवाईंकाचा गोतावळा जमा होतो. पण या जमा होण्यामागे गजूकाकांच्या काळजीपेक्षा संपत्ती आणि पैशांशी निगडीत अनेक गोष्टी कारणीभूत असतात. मुंबईतील एका प्रशस्त रुग्णालयात एकत्र आलेली ही मंडळी आणि तिथे उडालेला गदारोळ, होणारे गोंधळ या सा-या गोष्टी अतिशय मार्मिकपणे या चित्रपटातून मांडण्यात आल्या. प्रत्येक व्यक्तिरेखेची मांडणी आणि त्यासाठी केलेली कलाकारांची निवड ही या चित्रपटाची जमेची बाजू. या सा-या गोष्टींचं चित्रपट समीक्षकांनीही भरभरून कौतुक करत चित्रपटावर पसंतीची मोहोर उमटवली होती. 


नात्यांना मोकळा श्वास देणारा असा हा ‘व्हेंटिलेटर’ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपलासा वाटला. हा चित्रपट आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या माध्यमातून येत्या रविवारी २९ जानेवारीला सायंकाळी ७ वा. झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.