कॅलिफोर्निया : ऑस्कर पुरस्कारांसाठी किती पैसे खर्च केले जातात याची तुम्हाला कल्पना आहे का? एखाद्या चित्रपटाची पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी जवळपास ६,००० जण मतदान करतात. याच लोकांचे मत तयार करण्यासाठी जवळपास सर्वच फिल्म स्टुडिओ दरवर्षी पाण्यासारखा पैसा खर्च करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहींनी तर आजवर आपणच हा पुरस्कार मिळवण्यासाठी कसे पात्र आहोत हे पटवून देण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये पूर्ण पानभर जाहिरातीही छापल्या होत्या. एका अंदाजानुसार आपल्याच चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी दरवर्षी एकूण १० कोटी ते ५० कोटी डॉलर्स इतका खर्च फिल्म स्टुडिओजकडून केला जातो. निर्माते स्टीफन फॉलोज यांनी अभ्यास करुन हे अनुमान काढले आहे.


सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवण्यासाठी निर्मात्यांकडून एक कोटी डॉलर्स म्हणजे जवळपास ७० कोटी रुपये फक्त प्रचारावर खर्च केले जातात. मतदान करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न हे निर्माते करतात. प्रत्यक्ष लॉबिंग करण्यावर बंदी असल्याने काही निर्माते या मतदात्यांसाठी पार्टीचे आयोजन करतात.


अनेकदा काही वृत्तपत्रांमध्ये नामांकित झालेल्या चित्रपटांविरुद्ध वाईट साईट छापून आणण्यामागेही स्पर्धेतील इतर निर्मात्यांचा हात असतो. 'स्लमडॉग मिलियनेअर' चित्रपटातील कलाकारांना कमी पैसे दिल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्यामागे प्रतिस्पर्धी असल्याचे त्यावेळी म्हटले गेले होते.  २०१० साली 'हर्ट लॉकर' चित्रपटाला त्यांच्या निर्मात्यांनी मतदात्यांना पाठवलेल्या ई-मेल मुळे वाद झाला होता. त्यामुळे पुरस्कार घोषित झाल्यानंतर एका महिन्याने निर्मात्याच्या हातात तो पुरस्कार देण्यात आला होता. 


ऑस्कर जिंकणाऱ्या अभिनेत्यांच्या किंवा दिग्दर्शकांच्या कमाईतही भविष्यात भरपूर वाढ होते.  ही वाढ लाखो डॉलर्सच्या घरात असते. म्हणूनच नामांकन मिळालेल्या व्यक्तींकडून या प्रकारचा खटाटोप केला जातो.