जयंती वाघधरे, मुंबई : बॉक्स ऑफिसवर एकाचवेळी ५ ते ६ मराठी सिनेमा प्रदर्शित करुन मराठी निर्माते आत्मघात करतात. याचा मराठी सिनेमांना फटका बसतो. त्यामुळे बॉलिवूडच्या तुलनेत मराठी निर्मात्यांचा अॅप्रोच ठीक नसल्याचा सूर मराठी इंडस्ट्रीमध्ये घुमतोय. 


परिक्षेच्या दिवशीच नापास!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक शुक्रवार, हा त्या त्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांसाठी, विशेष करुन त्या सिनेमाच्या निर्मात्यासाठी परिक्षेचा दिवस ठरतो. अशातच एकीकडे मल्टीप्लेक्समध्ये मराठी सिनेमांना मिळणाऱ्या प्राईम टाईमचा मुद्दा असो किंवा बॉलिवुडच्या बड्या सिनेमांचं प्रदर्शन... या सगळ्या गोष्टींची किंमत मोजावी लागते ती बिचाऱ्या निर्मात्यालाच... यातच दुष्काळात बारावा माहिना म्हणजे जेव्हा आपल्याच मराठी इंडस्ट्रीतले दोन तीन निर्माते एकाच शुक्रवारी सिनेमाचा बळी द्यायला मोठ्या उत्साहानं मैदानात उतरतात.


एकाच आठवड्यात नऊ सिनेमे प्रदर्शित


गेल्या आठवड्यात दोन, तीन नाही तर तब्बल नऊ सिनेमे प्रदर्शित झाले होते. या नऊ सिनेमांमध्ये तीन हे मराठी होते. मंगेश देसाई आणि विद्या बालन स्टारर 'एक अलबेला'... मुक्ता बर्वे, किशोर कदम यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'गणवेश' आणि संदिप खरेचा 'दमलेल्या बाबांची कहाणी'... 


या तिनही सिनेमांपैकी 'गणवेश' आणि 'एक अलबेला' या दोन्ही सिनेमांना समिक्षकांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळाला, तरी सिनेमांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद आतापर्यंत मिळू शकलेला नाही.


आत्मघातकी प्रदर्शनाचा सिलसिला...


त्यातच अनुराग कश्यप दिग्दर्शित 'रमन राघव २.०', यामी गौतम, पुलकीत सम्राट यांचा 'जुनुनियत' यांसहीत तब्बल ६ हिंदी सिनेमे गेल्याच शुक्रवारी प्रदर्शित झालेत. एकीकडे २४ जूनचा शुक्रवार जिथे एकाच आठवड्यात ९ सिनेमे प्रदर्शित करुन, स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारली जाते तर दुसरीकडे १ जुलैच्या शुक्रवारी केवळ एकच सिनेमा प्रदर्शित होतोय. मग हे निर्माते जाणूनबुजून आत्मघात करत स्वत:चा जीव पणाला का लावतात? असा प्रश्न उपस्थित होतो.