मुंबई : 'दंगल'मध्ये छोट्या गीता फोगटचा रोल साकारलाय झायरा वासीम या काश्मीरच्या मुलीनं. सध्या झायराच्या अभिनयाची सगळीकडे चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या 'दंगल' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटींच्या कोटी उड्डाणे घेतलीय. या सिनेमाने तब्बल 411 कोटींची कमाई केली असून नव्या रेकॉर्डकडे या सिनेमाची वाटचाल सुरु झालीय. सिनेमात आमिर खान तर आहेच पण आमिर व्यतिरिक्तही एका कलाकाराने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे... झायरा वसीम.


'ऐसी धाकड है...!'


श्रीनगरमधील अवघ्या 16 वर्षांच्या या चिमुरडीने आपल्या अदाकारीच्या जोरावर सगळ्यांचीच वाहवा मिळविलीय. एवढचं नाही तर झायराला दंगलसाठी यंदाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळेल, असं भाकित वर्तविलं जातंय.


झायराला कुठलही अभिनयाचं बॅकग्राऊंड नाही. तिचे वडील श्रीनगरमध्ये एका बॅंकेत नोकरीला आहेत तर आई घर सांभाळते. मात्र, झायराला लहानपणापासूनचं अभिनयाचं वेड... ती ज्या वातावरणात वाढली त्याची तमा न बाळगता तिची पावलं वळली ती मायानगरीकडं... 


'दंगल' सिनेमाआधी झायरानं मायक्रोसॉफ्ट ल्यूमिया आणि 'टाटा स्काय'च्या जाहिरातींमध्ये काम केलं होतं. मात्र, तिचा दंगलपर्यंतचा प्रवास खरोखरच स्वप्नवत म्हणावा लागेल. खुद्द झायरालाच आपण दंगलमध्ये गीता फोगटच्या भूमिकेसाठी सिलेक्ट झालो, यावर विश्वास बसला नव्हता.


तब्बल 2500 मुलींचं ऑडिशन 'दंगल'साठी घेण्यात आलं होतं आणि या मुलींमधून झायराची निवड करण्यात आली.


झायरानंही सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेत गीता फोगटच्या कॉमनवेल्थमधील व्हिडिओचा बारकाईनं अभ्यास केला होता. कारण हा रोल तिच्यासासाठी सोपा नव्हता. दंगलमधील झायराच्या कामाचं सर्वत्र कौतुक होतंय.


झायरा वासीम आमिर-किरणसोबत

पुन्हा आमिरसोबत काम


ती आमिरसोबत आणखी एका सिनेमात ती झळकणार आहे. आमिरच्या होम प्रॉडक्शनच्या 'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमात झायरा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. एका काश्मिरी मुलीचा रॉकस्टार बनण्यापर्यंतचा प्रवास या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 


एकूणचं काश्मिरमध्ये वाढलेली ही चिमुरडी बॉलिवूडमध्ये मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. आता दंगल नंतर झायरा सिक्रेट सुपरस्टारमध्ये काय कमाल करते याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.