सिडनी : मराठी चित्रपट आणि नाटकांची लोकप्रियता आता देशाबाहेरसुद्धा वाढू लागली आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार पटकाविणा-या मराठी चित्रपटांचे प्रेक्षकांच्या मागणीवरून अनेक ठिकाणी खास शो रंगत आहेत. चित्रपटाप्रमाणेच नाटकांनाही परदेशात जोरदार मागणी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकंदरीतच आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी नाटक आणि चित्रपट अशी भरारी घेत असताना त्याच्या या कामगिरीचं कौतुकही आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावं या उद्देशाने दरवर्षी परदेशात मराठी नाट्य चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी 'माई' (Marathi Achievers and Awards International) या नावाने हा पुरस्कार सोहळा ऑस्ट्रेलियात दिमाखदार पद्धतीने रंगला होता. अनेक लोकप्रिय कलाकारांच्या उपस्थितीने आणि परफॉर्मन्सने रंगलेला हा सोहळा येत्या रविवारी १९ जूनला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.



ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील तमाम कलाकारांनी हजेरी लावली होती. या सर्वांच्या उपस्थितीने सिडनीत तयार झालेल्या मराठमोळ्या वातावरणात आपल्या कलाकारांनी एकाहून एक परफॉर्मन्स सादर केले. गायक संगीतकार अवधूत गुप्ते, बेला शेंडे आणि स्वप्निल बांदोडकर यांनी आपल्या बहारदार गायकीने प्रेक्षकांची मने जिंकली. तर केतकी माटेगावकर आणि सचिन पिळगावकर यांच्या सोबतीने अभिनेता जितेंद्र जोशीनेही आपल्या गायकीची झलक प्रेक्षकांना दाखवली. यासोबतच चंद्रकांत कुलकर्णी, राहुल रानडे, सुनिल बर्वे, अजित परब, सचिन खेडेकर, पुष्कर श्रोत्री, सचिन पिळगावकर आणि महेश मांजरेकर यांनी सादर केलेल्या ‘प्यार हमे किस मोडपे ले आया’ या गाण्याला तर उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते ‘गर्व महाराष्ट्राचा’ हा पुरस्कार.



आपल्या देदीप्यमान कामगिरीने मराठीचा झेंडा साता समुद्रापार नेणा-या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो आणि यावर्षी हा पुरस्कार महान क्रिकेटर सुनील गावस्कर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पुष्कर श्रोत्री, वंदना गुप्ते आणि डॉ. महेश पटवर्धन यांनी सुनील गावस्कर यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. चला हवा येऊ द्या च्या अतरंगी कलाकारांनी. थुकरटवाडीची मंडळी पहिल्यांदाच परदेशवारीसाठी निघालीयेत आणि विमानतळापासून विमानातला आणि सिडनीला पोहोचल्यानंतर त्यांचा उडणारा गोंधळ हे सगळं या मंडळींनी एका स्किटमधून सादर केलं आणि उपस्थितांना भरभरून हसवलं. 


चला हवा येऊ द्या कार्यक्रमाच्या तुफान लोकप्रियतेचं कौतुकही यावेळी करण्यात आलं. विनोदाचे अनभिषिक्त सम्राट दादा कोंडके यांच्या नावाने शाहीर दादा कोंडके पुरस्कार या टीमला देण्यात आला. लोकप्रिय अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी या सोहळ्याचं खुमासदार निवेदन केलं. एकंदरीतच परदेशात फडकलेला मराठी मनोरंजनाचा हा झेंडा बघून प्रत्येकच मराठी प्रेक्षकाला अभिमान वाटेल. हे सर्व क्षण प्रेक्षकांना बघायला मिळतील रविवारी १९ जूनला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरून प्रसारित होणा-या ‘माई’ पुरस्कार सोहळ्यातून.