मुंबई : स्वस्तात घर मिळण्याचे पोलिसांचे स्वप्न अखेर साकार होण्याच्या मार्गावर आहे. पनवेल येथे पोलिसांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांसाठी 2 एफएसआय मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांना अवघ्या 15 लाखांत 700  चौ. फुटाचे घर मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 काही पोलिसांनी एकत्र येऊन ‘बृहन्मुंबई सहकारी गृहनिर्माण सोसायटी, शिवाजीनगर’ची स्थापन केली. पोलिसांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देणे हा त्यामागचा उद्देश आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रताप दिघावकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
 
एक्सप्रेस वे येथे वायाळ गावाजवळील जमीन खासगी जमीन मालकांकडून स्वस्तात खरेदी करण्यात आली आहे. जमिनीची मूळ किंमत 500 रूपये प्रति चौरस फूट आहे. परंतु सोसायटीने 130  रूपये प्रति चौ. फूट किंमतीत 106  एकर जमीन खरेदी केली आहे. 600  चौरस फूट कार्पेट एरिया आणि 775  चौरस फूट बिल्टअप एरिया असलेली  दहा हजार घरे बांधण्यात येणार आहेत.

स्विमिंग पूल, मल्टीप्लेक्स, रिक्रिएशन सेंटर अशा अद्ययावत सुविधांनी युक्त सोसायटी ना नफा ना तोटा तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. आतापर्यंत एकूण 5243 सभासदांनी नोंदणी केली असून आणखी चार ते साडेचार हजार सभासदांची नोंदणी करण्यात येणार आहे.
 
या सोसायटीसाठी 30 कोटी रूपयांचा प्रिमियम माफ करण्याचा प्रस्ताव गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मुख्यमंत्र्यासमोर ठेवला आहे. या प्रस्तावाला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.