औरंगाबाद : 5 कोटीच्या खंडणीसाठी औरंगाबादेत एका 10 वर्षीय चिमुकल्याची हत्या करण्यात आली. औरंगाबादच्या टिळकनगर भागातील गुरुकुंज हौसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं शोधमोहीम हातात घेतली आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्धन विवेक घोडे. वय वर्ष 10. पैशाच्या हव्यासापोटी या चिमुकल्याचं अपहरण करुन हत्या झाल्याचं उघड झालंय... सोमवारी रात्री 8 वाजता आरोपी अभिलाष मोहनपूरकर आणि त्याचा नौकर शाम मगरे या दोघांनी वर्धनचं अपहरण केलं. त्याच्या पालकांकडून 5 कोटी खंडणी घ्यावी आणि झटपट श्रीमंत व्हावं असा आरोपींचा डाव होता.


आरोपी वर्धनला घेवून खुलताबादच्या रस्त्यानं घेवून गेले. त्यावेळी वर्धननं आरोपींसह झटापट करत त्यांच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आरोपींनी वर्धनला मारहाण करत त्याचा गळा दाबला आणि त्यातच वर्धनचा मृत्यू झाला.


आरोपींनी मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून पुन्हा वर्धनच्या घराकडे आणला आणि नाल्यात फेकून दिला. आरोपी एवढं करुन थांबले नाही तर त्यांनी वर्धनच्या कुटुंबासह त्याला शोधण्याचं नाटक सुरू केलं. मात्र पोलिसांच्या नजरेतून त्यांच्या संशयित हालचाली सुटल्या नाहीत. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी वर्धनचा खून केल्याचं कबूल केले. 
 
आरोपी वर्धनच्या घराशेजारीच रहात होते. त्यांनी अनेक दिवसांपासून चिमुकल्या वर्धनसह मैत्री केल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपी अभिलाष मोहनपूरकरचे वडील मोठे बिल्डर असल्याचं समजत आहे. सुखवस्तू घरातल्या तरुणाने अपहरण आणि हत्येचा प्रकार केल्यानं आश्चर्य व्यक्त होतेय. 


वर्धनचे वडील विवेक घोडे हे देखील मोठे बिल्डर होते, मात्र काही वर्षांपूर्वी त्यांचीही ठाण्यात गोळी घालून हत्या झाली होती. तेव्हापासून वर्धन आणि त्याची आई आजी-आजोबांसोबत राहत होते. मात्र कुणाच्या तरी झटपट श्रीमंत होण्याच्या नादात हे कुटुंब मात्र उद्धवस्त झाले आहे.