कोल्हापूर : म्हैसूरमधील जगमोहन पॅलेसमध्ये 'ग्लो ऑफ होप' नावाचं जगप्रसिद्ध चित्र आहे. या चित्रातली मुलगी  गीताताई उपळेकर यांनी गुरूवारी शंभरीत पदार्पण केलंय. या कोल्हापूरच्या १०० वर्षीय मॉडेलची कहाणी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हैसूरच्या जगमोहन पॅलेसमधली आर्ट गॅलरी प्रसिद्ध आहे ती राजा रविवर्मा यांच्या सोळा चित्रांसाठी. याच चित्रांच्या पंगतीतलं द लेडी वुइथ लॅम्प अर्थात ग्लो ऑफ होप हे चित्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. जगात जलरंगातील सर्वोत्कृष्ट तीन चित्रांमध्ये या चित्रानं स्थान मिळवलंय. 


आजूबाजूला रामायण, महाभारत आणि मुघलकालीन राजा रविवर्मांची चित्रं असल्यामुळं ग्लो ऑफ होप ही देखील त्यांचीच कलाकृती आहे, असा अनेकांचा समज होतो. पण  हे चित्र  साकारलंय ते सावंतवाडीचे सावळाराम हळदणकर यांच्या कुंचल्यातून. या चित्राची कथाही गंमतीशीर आहे.


 हळदणकरांची गीता ही १५  वर्षांची मुलगी दिवाळीच्या सणाला दिवे लावत होती. हळदणकरांच्या कलासक्त डोळयांनी ते दृश्य कागदावर चितारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गीताला हातात दिवा घेऊन उभं केलं आणि कुंचल्यावर जे चित्र साकारलं त्यानं इतिहास घडवला.


१९३२ साली तयार झालेलं हे ऐतिहासिक चित्र म्हैसूरचे राजे जयचमा राजेंद्रा वडियार यांनी  ३ हजार रुपयांना विकत घेतलं. त्यानंतर आर्ट गॅलरीत हे चित्र राजा रावीवर्मांच्या चित्रांच्या पंगतीत बसवण्यात आलं.


आज त्याच चित्रातल्या मॉडेल असलेल्या गीताताईंनी शंभरीत पदार्पण केलंय. त्यांच्या कुटुंबियांसाठी हा आनंदी सुवर्णक्षण ठरलाय.


उपळेकर कुटुंबीयांसोबतच कोल्हापूरच्या कला परंपरेसाठी देखील हा क्षण संस्मरणीय असणाराय. एका जगप्रसिद्ध चित्राची मॉडेल कोल्हापुरात असणं आणि तिनं वयाच्या शंभरीत प्रवेश करणं हे कोल्हापूरच्या कला इतिहासात आगळीवेगळी भर घालणारं आहे.