नोकराने घात केला, १५ लाखांच्या खंडणीसाठी मुलाचा खून
कापड व्यापाऱ्याच्या मुलाचं १५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करुन खून करण्याची घटना कल्याणमध्ये घडलीय.
कल्याण : येथील एका कापड व्यापाऱ्याच्या मुलाचं १५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करुन खून करण्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलीय. नोकरानेच आपल्या साथिदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.
कल्याण शहरात राहणारे कापड व्यापारी संतोष जैन यांचा सात वर्षांचा मुलगा नयन याचं काल संध्याकाळी गांधी चौकातून अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणकर्त्यांनी जैन कुटुंबाकडं १५ लाखांची खंडणी मागीतली होती. जैन कुटुंबियांनी खंडणीची रक्कम देण्याची तयारी दाखवली.
अपहरणकर्त्यांनी खंडणीची रक्कम टिटवाळा ते आंबिवलीच्या दरम्यान एका ठराविक ठिकाणी टाकण्यास सांगितले. त्याप्रमाणे जैन यांनी ती रक्कम टाकली. पैशाचू बॅग घेवून जाण्यासाठी आलेली आरोपी अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि या अपहरणामागच्या चेह-यांचा पर्दाफाश झाला.
संतोष जैन यांच्या कापड दुकानात काम करणारा राजेश मोरे आणि त्याचे साथिदार विजय दुबे, राजेश देशराज या तिघांनी हा अपहरणाचा डाव आखला होता. तिन्ही आऱोपींचा नयनचे वडील संतोष जैन यांच्याषी चांगला परिचय होता. तसेच संतोष जैन यांच्या आर्थिक परिस्थितीची त्यांना कल्पना होती. आरोपींना पैशांची गरज होती. जैन यांच्या मुलाचं अपहरण करुन झटपट पैसा कमावता येईल असं आरोपींना वाटलं आणि त्यातूनच आरोपींनी नयनच्या अपहरणाचा प्लॅन आखला.
नयन स्कूल बसमधून घरी जात असतांना आरोपी राजेश आणि देशराज त्याच्या मागावर होते. तो स्कूल बसमधून उतरुन घरी जात असतानाच आरोपींनी त्याला इमारतीच्या जिन्यामध्ये गाठलं.
नयन घरी न आल्यामुळे त्याच्या आईने त्याच्या मित्रांकडं चौकशी केली असता तो दोन व्यक्तीसोबत मोटरसायलवरुन गेला असल्याचं त्यांना समजलं. नयनचा शोघ घेत असतांना अपहरणकर्त्यांनी जैन यांच्याकडं १५ लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर घाबरलेल्या
जैन कुटुंबाने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम हाती घेतली. पोलिसांनी काल रात्रीच ५ टीम्स तयार करुन कल्याण ते मुरबाड पट्यात आऱोपींचा शोध सुरु केला. नयनमुळे आपलं बिंग फुटेल या भितीने आरोपींनी अपहरण केल्यानंतर नयनचा खून करुन मृतदेह नदीत फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना जेरबंद केलंय. अपहरण आणि हत्येच्या या घटनेमुळे कल्याण शहरात एकच खळबळ उडालीय.