नितीन  पाटणकर, पुणे : पंजाबमधील नशेचे चित्र दाखवणारा 'उडता पंजाब' चित्रपट काही दिवसांपूर्वी आला होता. त्याच धर्तीवर पुणे देखील 'उडते पुणे' होऊ लागलंय का? असा प्रश्न पडावा अशी माहिती पुढं आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दारू पिऊन गाडी चालवल्याचे, म्हणजेच 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह'चे तब्ब्ल २७,००० गुन्हे दाखल झाले आहेत. दारू पिऊन गाडी चालवल्यानं २०० अपघात झाले आहेत. तर, अशा अपघातात १३ मृत्यू झाले आहेत. पुण्यात दारू पिणाऱ्यांची आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीतूनच ही बाब पुढं आलीय.... 


वाहतूक पोलिसांनी.... 


- २०१३ मध्ये दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या ४,८०० जणांवर कारवाई केली


- २०१४ मध्ये ४००० तर


- २०१५ मध्ये ५,८०० जणांवर


- आणि २०१६ मध्ये जुलैपर्यंतच गाडी चालवणाऱ्या १२,५०० जणांवर कारवाई करण्यात आलीय


कारवाईच्या या आकडेवारी बरोबरच अपघातांची आकडेवारीदेखील धक्कादायक आहे...


- दारू पिऊन गाडी चालवल्यानं पुण्यात मागील तीन वर्षात २०० अपघात झाले आहेत


- तर, या अपघातात १३ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.


माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी ही माहिती दिलीय. दारू पिणाऱ्यांची आणि दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची संख्या वाढत असताना आणि त्यामुळे अपघात वाढत असताना, त्यांना पायबंद घालण्यासाठी यंत्रणा मात्र अपुरी पडत आहे. पुण्याची लोकसंख्या ३५ लाखांच्या पुढे गेली आहे आणि वाहनांची संख्यादेखील तेवढीच आहे. वाहतूक पोलिसांकडील 'ब्रेथ अल्कोहोल अॅनालायझर'ची संख्या फक्त १११ आहे. वाहतूक पोलिसांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्यादेखील कमी आहे. 


दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची आणि त्यामुळं झालेल्या अपघातांची संख्या पाहता... उडता पंजाब प्रमाणे उडते पुणे होण्याच्या मार्गावर तर नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय.