नागपूर : नागपूरच्या वाढत्या पाऱ्याने तीन बळी घेतलेत. चढत्या तापमानापासून बचाव करण्याकरिता घरात लावलेल्या कुलरचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या माणकापुर परिसरातील निवासी संकुलात कुलरनं एकाच परिवारातील तिघांचा बळी घेतलाय. पोलिस खात्यातून सहायक पोलिस निरीक्षक पदावरून ३ वर्षापूर्वी निवृत्त झालेले ६१ वर्षाचे किशोर दामले इथं राहायचे. त्यांची मुलगी विनिषा माहेरी आली होती. 


उन्हाचा पारा चढला होता आणि कुलरमधील पाणी कमी झालं म्हणून ती कुलरमध्ये पाणी टाकण्यास गेली आणि तिला विजेचा जोरदार धक्का बसला. कुलरसह ती खाली कोसळली. मुलीला शॉक लागल्याचं कळताच तिची आई तिच्या मदतीला धावली आणि तिलाही विजेचा धक्का बसला.. 


हा सर्व प्रकार बघून गोंधळलेल्या किशोर दामले यांनी पत्नीला आणी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना देखील विजेचा धक्का लागला. विजेचा धक्का इतका तीव्र होता कि तिघांचा घटना स्थाळावरच मृत्यू झाला. 


घडलेला प्रकार शेजाऱ्यांना कळला तेव्हा त्यांनी तातडीने माणकापुर पोलिसांशी संपर्क साधला. घटना घडली तेव्हा विनिषाचा १८ महिन्याचा मुलगा घरीच होता मात्र तो कुलरपासून लांब असल्यानं वाचला. नागपूरचं तापमान दिवसेंदिवस वाढतंय. त्यामुळे कुलर सारख्या उपकरणांचा वापर अनिवार्य आहे. मात्र या दुर्घटनेनंतर प्रत्येकानं कुलरचा वापर करताना काळजी घेणं गरजेचं आहे.