नांदेडमधील दुर्घटनेत 4 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 4 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर शाळेत खेळत असताना वीज पडून एक विद्यार्थी जखमी झाला.
नांदेड : जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 4 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर शाळेत खेळत असताना वीज पडून एक विद्यार्थी जखमी झाला.
हिमायतनगर तालुक्यातील पवनामध्ये घराच्या बांधकामासाठी खड्डे खोदण्यात आले होते. त्यात पावसाचं पाणी साचलं होतं. बाजूलाच खेळणाऱ्या सहा वर्षीय तनुजा चिकलेवाड आणि 5 वर्षीय पुनम गुंडेवाड खड्ड्यात पडल्या. त्यातच दोघींचा मृत्यू झाला.
तर कंधार तालुक्यातील पांगरामध्ये दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या पांडुरंग कोंदे आणि गोविंद ठाकूर यांचा तलावाजवळून जाताना तोल गेल्याने ते पाण्यात पडले. यावेळी जवळच असणाऱ्या एका शेतक-याने तलावात उडी घेतली. मात्र, या चिमुकल्यांना वाचवण्यात त्यांना अपयश आले.
त्याचबरोबर मुखेड तालुक्यातील पोकर्णामध्ये शाळेत खेळत असताना अंगावर वीज पडून अफरोज शेख हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. या घटनांमुळे हिमायतनगर आणि कंधार तालुक्यात शोककळा पसरलीय.