दुचाकीच्या डिक्कीतून ५ लाख लांबवले
जळगावमध्ये वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याचा फायदा उचलत २ चोरट्यांनी वृद्ध व्यापाऱ्याचे ५ लाख रुपये लुटलेत.
जळगाव : जळगावमध्ये वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याचा फायदा उचलत २ चोरट्यांनी वृद्ध व्यापाऱ्याचे ५ लाख रुपये लुटलेत. अवघ्या २२ सेकंदात चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून हे पैसे लांबवलेत.
जळगावातील जिकर हाजी युसूफ राणानी यांचं मिठाचे दुकान आहे. दुकान बंद करुन ते दुचाकीनं घरी जात होते. त्यावेळी मिठाई घेण्यासाठी ते एका दुकानाजवळ थांबले.
दुचाकी लावून दुकानाजवळ जात नाही तोच दोन भामटे तिथं आले. एकाने दुचाकीची डिक्की उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिल्या प्रयत्नात डिक्की उघडली नाही.
दुसऱ्या प्रयत्नांत अवघ्या २२ सेकंदात डिक्कीमधील कापडी पिशवी घेऊन चोरटे पसार झाले., या कापडी पिशवीत सुमारे ५ लाख रुपयांची रोकड होती. चोरट्यांचा हा प्रताप सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.