आमिर खान होणार `जलयुक्त शिवार`चा ब्रँड अॅम्बॅसेडर
मुंबई : असहिष्णुतेच्या वादावरुन बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ आता संपण्याची चिन्ह दिसतायत.
मुंबई : असहिष्णुतेच्या वादावरुन बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ आता संपण्याची चिन्ह दिसतायत. महाराष्ट्र सरकार आमिर खानला 'जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी योजनेचा 'ब्रँड अॅम्बॅसेडर' म्हणून नियुक्त करण्याची शक्यता आहे.
१३ फेब्रुवारीला 'मेक इन इंडिया' कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या सहभोजन कार्यक्रमात मोदींची आमिरशी भेट झाली. या भेटीदरम्यान जलयुक्त शिवाराच्या ब्रँड अॅम्बेसिडेर होण्याबाबत चर्चा झाली होती.
आमिर खान आता या योजनेअंतर्गत झालेल्या कामांच्या ठिकाणी भेट देऊन ही योजना समजून घेईल. त्यानंतर तो महाराष्ट्र सरकारसाठी काही जाहिरातींचे चित्रीकरण करेल.
काही दिवसांपूर्वी आमिरने त्याची पत्नी किरण राव हिने आपण देश सोडून जाण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यामुळे देशभरात मोठा वादंग उठला होता. भाजप समर्थकांसह अनेकांनी त्याच्यावर कडाडून टीका केली होती. यानंतर 'अतुल्य भारत'च्या ब्रँड अॅम्बॅसेडरपदावरुनही त्याची हकालपट्टी करण्यात आली होती. स्नॅपडिल' या ई-कॉमर्स कंपनीने सुद्धा त्याच्यासोबतच्या कराराचे नूतनीकरण केले नाही. मात्र आता त्याला जलयुक्त शिवारचा ब्रँड अॅम्बॅसेडर बनवण्याचा राज्य सरकारचा निर्णय भाजप समर्थकांनाच कितपत रुचतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.