नाशिक : बळीराजा मशागतीत गुंतलाय. तर बियाणांची आणि खतांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या मखमलाबाद शिवारातील शेतीची मशागत करणारा हा आहे तरूण शेतकरी सचिन जगझाप. गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरड्या पडलेल्या जमिनीचा दाह थो़ड़याच दिवसांत पडणाऱ्या पावसाने कमी होईल. पुन्हा एकदा शेतीत भरघोस उत्पादन येईल असा विश्वास सर्वच शेतकरी व्यक्त करत आहेत.


जिल्ह्यात मान्सूनपूर्व कामांना गती आलीय. कुठे मशागत तर कुठे तण, कचरा निवडणी केली जातेय. तर काही ठिकाणी आहे त्या पिकांची काळजी घेण्यासाठी, वादळ वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. 


एकीकडे शेतकऱ्याची मान्सूनपूर्व तयारी सुरू असताना प्रशासनही तयारीत गुंतलंय. पावसाळ्याच्या दिवसांत दरवर्षी खत आणि बियाणांची साठेबाजी केली जाते. त्यावर अंकूष ठेवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसलीय. साठेबाजांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. 


मागील वर्षापासून चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर, येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यातली भीषण पाणी टंचाई जाणवतेय. त्यामुळे आता धुंवाधार पावसाची आवश्यकता आहे. बळीराजाची प्रतिक्षा आता लवकर संपावी आणि लवकरात लवकर वरूणराजा बरसावा अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.