नाशिक : कर्जमाफी होईल या आशेने शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम न भरल्याने राज्यात जिल्हा बँका अडचणीत आल्या आहेत. वर्षाअखेरीस जिल्हा बँकांचा ताळेबंद यामुळे धोक्यात आला आहे. नोटाबंदीमुळे साडेतीनशे कोटी रूपये पडून असल्याने आधीच अडचणीत असलेली नाशिक बँक आर्थिक संकटात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतक-यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिकची ही जिल्हा मध्यवर्ती बँक. इमारत आधुनिक आणि श्रीमंत दिसत असली तरी तिजोरी मात्र पूर्णपणे रिकामी झाली आहे. या बँकेतल्या शेतक-यांना, सभासदांना आता त्यांचा पैसा मिळत नाहीये की त्यांचे चेकही वटत नाहीयेत. यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संकटात आला आहे. यामुळे संतप्त शेतक-यांनी थेट शाखा कर्मचांना कोंडून ठेवलं आणि राग काढला. 


२ लाख २४ हजार सभासद असलेल्या या बँकेत दोन लाखांहून अधिक कर्जदार आहेत. त्यांच्याकडे १५६२ कोटी रूपये कर्ज थकीत आहे. एकूण कर्ज २७९५ कोटी रूपये आहे. गेल्यावर्षी या बँकेचा २७ टक्के एनपीए आहे. कर्जमाफी होणार म्हणून व्याज आणि मुद्दल भरण्यास शेतकरी तयार नसल्याने हा टक्का वाढणार आहे. त्यामुळे बँक अडचणीत येण्याची स्थिती आहे. 


संपूर्ण राज्यात हीच स्थिती आहे. सरकारने जर कर्जमाफी केली नाही तर बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देऊ शकत नाहीत. कारण शेतकरी मागील वर्षाचे कर्ज फेडत नाहीत. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातात काही नसल्याने पेरणी कशी करतील हे प्रश्न निर्माण होणार आहेत. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी उपाय-योजना करण्याची मागणी होत आहे.