कपिल राऊत, ठाणे : राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत एक दोन नाही तर तब्बल ४१ पदकांची कमाई करणाऱ्या अग्रता मेलकुंडे या खेळाडूची ठाणे पालिकेकडून उपेक्षा सुरु आहे. केवळ फी भरली नाही म्हणून अग्रताला पालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअमवर सराव करण्यापासून रोखण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोक्यावर वडिलांच्या आधाराचं छप्पर नाही. घरात दोन शिफ्टमध्ये काम करणारी आई... सरावाला चिखलमाती आणि दगड-गोट्यांचं मैदान... अशा खडतर परिस्थितीत अग्रता मेलकुंडेनं गोळाफेकचा सराव केला. या बिकट परिस्थितीवर मात करत तब्बल ३६ गोल्ड, चार सिल्वर आणि एक ब्राँझ मेडल अशी भरभक्कम कमाई तिनं केली. नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वीच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही तिनं गोल्ड पदक मिळवलं. 


मात्र, असं असतानाही स्वतंत्र क्रीडा खातं असणाऱ्या ठाणे पालिकेकडून अग्रताची उपेक्षा सुरु आहे. पालिकेकडे कोट्यवधीचा निधी असतानाही गरीबीच्या परिस्थितीत गोळाफेकमध्ये नाव कमावणाऱ्या अग्रतावर होणाऱ्या या अन्यायाबाबत आता नाराजी व्यक्त होतेय. एवढी पदकं मिळवल्यानंतरही ठाण्यातल्या एकाही लोकप्रतिनिधीचं तिच्याकडे लक्ष नसल्याने संताप व्यक्त होतोय.


'झी २४ तास'च्या बातमीची दखल


'झी २४ तास'नं ही गंभीर बाब ठाणे महापौर संजय मोरे आणि ठाणे अधिकाऱ्यांसमोर आणल्यावर त्यांना धक्का बसलाय. या बातमीची तात्काळ दखल घेत चौकशी करून संबंधितांवर कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलंय.


सुवर्ण पदकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात कमाई करणारी एकमेव मुलगी ठाण्यात राहत असूनही, तिचं कोणत्याच लोकप्रतिनिधीनं साधं कौतुकही केलेलं नाही. आत्तापर्यंत त्यांनी एका शब्दानेही तिला शुभेच्छा दिलेल्या नाहीत, याचाही उल्लेख करायला हवा.