प्रशांत शर्मा, झी मीडिया, संगमनेर, अहमदनगर : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडीया, मेक इन इंडीया अशा महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात आजही संपर्क यंत्रणेंचा बोजवारा उडालाय. अहमदनगर जिल्ह्यातल्या 15 गावांनी त्याचाच निषेध म्हणून आंदोलन केलं. 
 
 नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर, नगर जिल्ह्यामधल्या संगमनेर तालुक्यातला पठार भाग आहे. त्यातली तांगडी, वनकुटे, कोठे आणि इतर अशी १५ गावं आजही संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. या गावांतल्या पंचक्रोशीत संपर्क करण्यासाठी मोबाईल चालू शकत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



गावकऱ्यांनी गावात मोबाईल मनोरा उभारण्यासाठी सर्वंच कंपन्यांकडे पाठपुरावा केला. मात्र गेल्या १० वर्षांपासून आश्वासनां पलिकडे काहीच मिळालं नाही. मोबाईलची रेंज शोधत सात - आठ किलोमीटर पळावं लागतंय. जिल्हा परिषद शाळांमधल्या डिजिटल क्लासरुमही इंटरनेट सेवेअभावी कवडीमोल ठरल्यात. याबाबत सरकार दरबारी पाठपुरावा करुनही ग्रामस्थांच्या पदरी निराशाच आली. 


ही 15 गावं दुर्गम भागातली असून तिथे बीएसएनएलची लँडलाईन सेवा सुरु आहे. त्यामुळे ही गावं संपर्क क्षेत्राच्या बाहेर नसल्याचा दावा, संगमनेर भारत दुरसंचार निगम लिमिटेडचे अधिकारी करतात. मात्र हा दावा किती फोल आहे, ते प्रत्यक्ष दिसतच आहे.