बालकवींचं स्मारक उद्ध्वस्त होणार?
एकीकडं आपण मराठी राजभाषा दिवस साजरा करतो, तर दुसरीकडं ज्यांनी आपल्या काव्यातून मराठी भाषा जोपासली, अशा साहित्यिकाचं स्मारक उद्धवस्त होताना पाहावं लागतंय...
विकास भदाणे, जळगाव : एकीकडं आपण मराठी राजभाषा दिवस साजरा करतो, तर दुसरीकडं ज्यांनी आपल्या काव्यातून मराठी भाषा जोपासली, अशा साहित्यिकाचं स्मारक उद्धवस्त होताना पाहावं लागतंय... आम्ही बोलतोय ते बालकवींबद्दल... जळगावच्या भादली रेल्वे स्टेशनजवळचं त्यांचं स्मारक का उद्धवस्त होणार आहे?
'श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरूनी ऊन पडे...'
'ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतून'
या आणि अशा एकाहून एक सरस निसर्ग कविता ज्यांनी शब्दबद्ध केल्या ते त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी... ५ मे १९१८ मध्ये जळगावच्या भादली रेल्वे स्टेशनवर रेल्वे रूळ ओलांडताना बालकवींचं अपघाती निधन झालं. बालकवींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मध्य रेल्वेनं 1990 मध्ये स्टेशनवरच त्यांचं छोटेखानी स्मारक बांधलं. मात्र, हेच स्मारक आता मध्य रेल्वेच्या दुहेरीकरणाच्या कामात उद्ध्वस्त होणार आहे. मराठी काव्य रसिक आणि साहित्यिकांच्या जिव्हाळ्याचा केंद्रबिंदू असलेलं हे स्मारक नव्या इमारतीत स्थलांतरित करण्याबाबत रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र रेल्वेकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळं स्मारकाचं काय होणार? असा प्रश्न आता निर्माण झालाय.
बालकवी आणि जळगावचं अतूट नातं...
ब्रिटिशकाळात बालकवी धरणगावला वास्तव्याला होते. १९०८ साली साहित्य संमेलनात त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी आपली पहिली कविता सादर केली. दहा-बारा वर्षांतच बालकवींनी १६३ कविता लिहिल्या. भादलीला त्यांच्या जीजीच्या मुलीच्या विवाहानिमित्त बालकवी आले होते. जळगावला आपल्या मित्राच्या भेटीला ते जात होते. तेव्हा रेल्वे रूळ ओलांडताना ५ मे १९१८ मध्ये भादली रेल्वे स्टेशनवर त्यांचं अपघाती निधन झालं. धरणगावमध्ये दोन एकर जागेवर बालकवींचं स्मारक उभारण्यासाठी साहित्य कला मंचनं पुढाकार घेतला होता. पण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते काम रखडलंय.
एकीकडं धरणगावातलं नवं स्मारक उभं राहत नाही आणि दुसरीकडं असलेलं जुनं स्मारकही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं साहित्यप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे.
बालकवींचं सध्याचं स्मारक रेल्वेच्या जागेत आहे. रेल्वे रुंदीकरणात ते उद्ध्वस्त होत असेल तर ते पर्यायी जागेत स्थलांतरीत करण्याबाबत आता राज्य सरकारनंच पाठपुरावा करण्याची गरज आहे. बालकवींसारख्या साहित्यिकाचं साधं स्मारक आपण वाचवू शकणार नसू, तर मराठी भाषा दिवस साजरा करण्याला काय अर्थ आहे? असा सवाल आता उपस्थित होतोय.