पुणे : जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपालिका असा नावलौकिक असलेली बारामती नगरपालिका निवडणूक येत्या १४ डिसेंबरला होत आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले होते.  केवळ एकाच जागेवर अपक्ष नगरसेवक विजयी झाला होता. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपसह शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष यांची सर्वपक्षीय आघाडी झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामतीच्या विकासाच्या गप्पा मारून  सत्ताधारी जनतेला फसवत असल्याचा आरोप राष्ट्रवादीवर सर्वपक्षीय बारामती विकास आघाडीने केला आहे. यंदा बारामती विकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडणून येतील, असा  दावा भाजपचे नेते करीत आहेत.


बारामतीतील मतदार हे सुज्ञ आणि जाणकार आहेत. बारामती विकास आघाडीच्या पाठिशी जनता खंबीरपणे उभी राहणार असल्याचा विश्वास  विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार व्यक्त करत आहेत. बारामतीतील दलितवस्ती  आणि बहुजन समाज हा विकासापासून दूरच राहिल्याचा आरोप बहुजन समाजवादी पार्टीने केला आहे. बहुजन समाजवादी पार्टीचे २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  


दरम्यान, विरोधकांनी कितीही आरोप केले तरी विकास कामाच्या जोरावर राष्ट्रवादी पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने पवारांच्या गडाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठीच स्वत: मुख्यमंत्री प्रचारासाठी बारामतीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र बारामती शहरातील मतदार  यंदा कुणाला पसंती देणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.