अखिलेश हळवे, नागपूर : दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र बाजार फुलले असताना, दुसरीकडे मात्र याच बाजारावर भेसळयुक्त पदार्थ विक्रीचे सावट आहे. दिवाळीच्या निमित्ताने एफडीएनं मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीच्या निमित्ताने नागपूरच्या शंकर नगर भागात राहणाऱ्या कविता गोसावी या गृहिणीने नुकतेच आपल्या घराकरता खाद्य पदार्थ विकत आणले. मात्र काही दिवसांपूर्वी विकत आणलेल्या बेसनात किडे आढळले. तिखटाचा तर रंगच उडाला. खाद्य तेल विकत घेताना तर त्यावरील लेबल आणि जाहिरातींवर विश्वास कसा ठेवायचा? हा प्रश्न त्यांना पडलाय. त्यामुळे विकत आणताना कितीही किंमत मोजावी लागली तरीही खाद्य पदार्थ खाण्यायोग्य असतीलच याची कुठलीच खात्री नाही.


दिवाळीच्या निमित्ताने भेसळ-युक्त पदार्थ विकले जाण्याची आशंका असल्याने एफडीएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कारवाईत सुरु  केलीय. विदर्भातील ११ जिल्ह्यात तब्बल १.८० कोटींचे खाद्य तेलाचा साठा जप्त केला आहे. याशिवाय रवा, मिठाई, वनस्पती, दूध, खवा आणि इतर खाद्य पदार्थांचे नमुनेदेखील घेतले आहेत, अशी माहिती सह आयुक्त शशिकांत केंकरे यांनी दिलीय.  


ही कारवाई उत्पादक, विक्रेता, आणि इतर सर्वच स्तरावर होणार आहे. एकूणच एफडीएच्या माध्यमाने कारवाई होत असताना, यातून काही ठोस निष्पन्न व्हावे हीच नागपूरकरांची अपेक्षा आहे.