शशिकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : आपल्या मालकावर तीन अस्वलांनी हल्ला चढविल्याने मालकाचा जीव वाचवण्यासाठी दोन पाळीव कुत्रे चक्क तिन्ही अस्वलींशी भिडले. त्याच्या या धाडसामुळं मालकाचा जीव वाचला. यवतमाळ च्या आर्णी तालुक्यातील पाळोदी गावात शेतकरी सत्तू आडे सोबत हा थरार घडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सत्तू आडे हे ६५ वर्षीय शेतकरी सकाळी साडे सात वाजताचे सुमारास आपल्या शेतात पर्हाटीचे बोण्ड वेचायला निघाले. शेताच्या मार्गावर असतांना अचानक झुडपांमधून अस्वली समोर आल्या. तीन अस्वलींनी एकाएक सत्तू आडे यांच्यावर हल्ला चढविला. सत्तू यांना खाली लोळवून अस्वली त्यांना फरफटत नेत होते त्यामुळे घाबरलेल्या सत्तू यांनी आरडाओरड केला. यावेळी सत्तू यांचे सोबत दोन पाळीव कुत्रे होते. मालक संकटात असल्याचे बघून कुत्र्यांनी अस्वलांवर झडप मारली. मालकाला अस्वलांच्या तावडीतून सोडवीत तिन्ही अस्वलांना त्यांनी पिटाळून लावले. या हल्ल्यात सत्तू आडे यांच्या मानेला आणि पायाला गंभीर दुखापत झाली खरी, मात्र त्यांचे प्राण वाचले.  


अस्वलांच्या हल्यात जखमी सत्तू आडे यांना त्यानंतर ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. राखणदार, प्रामाणिक स्वभावामुळे आपल्या मालकाशी असलेले एकनिष्ठ नाते आणि आपल्या माणसांवर निरपेक्ष प्रेम ही कुत्र्याची वैशिष्टय़े मानली जातात ती या घटनेने खरी ठरली आहे.