मुंबई : एकीकडं मराठवाडा पाण्यासाठी टाहो फोडतोय... तर त्याच दुष्काळी मराठवाड्यात बीअर आणि दारू उत्पादनासाठी पाण्याचा मुबलक पुरवठा होत असल्याची ओरड होतेय. काय आहे वस्तुस्थिती, पाहूयात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुष्काळानं होरपळत असलेला मराठवाडा... पाण्यासाठी तिथं लागू झालेली पाणीबाणी... पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन् मैल करावी लागणारी वणवण... एकीकडं पाण्याअभावी घशाला कोरड पडलीय, तर दुसरीकडं बीअर आणि दारू उत्पादनासाठी मात्र शुद्ध पाण्याचा मुबलक वापर केला जातोय. मराठवाड्यातल्या १२ मद्य उद्योगांसाठी दिवसाला जेवढ्या पाण्याचा वापर होतो, तेवढ्या पाण्यात लातूर शहराची दोन दिवसांची तहान भागू शकते. त्यामुळं पाणीटंचाई असताना दारू कारखाने तीन महिने बंद ठेवावेत अशी मागणी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी केलीय.


मराठवाड्यात सध्या पाण्याचा वापर कसा होतोय, ते पाहूयात...


- जायकवाडी धरणातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ दररोज ५६ एमएलडी पाणीउपसा करतं.


- त्यापैकी २४ एमएलडी पाणी पिण्यासाठी वापरलं जातं.


- तर ३२ एमएलडी पाणी उद्योगांना दिलं जातं.


- त्यापैकी ४ एमएलडी पाणी बिअर व दारू कारखान्यांना पुरवलं जातं.


- पिण्याच्या पाण्यासाठी दर हजार लिटरमागे ६ रूपये,


- उद्योगांच्या पाण्यासाठी हजार लिटरमागे १६ रुपये,


- तर दारू कारखान्यांकडून हजार लिटरला १९ रुपये आकारले जातात. 


सिंचनाच्या पाण्याच्या तुलनेत हे प्रमाण फारच कमी आहे, असा युक्तिवाद आता केला जातोय. शिवाय या दारू आणि बीअर उत्पादक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या ५५०० कामगारांचं काय? एकीकडं पाण्याअभावी इतर उद्योग बंद पडतायत. तर दुसरीकडं जे उद्योग व्यवस्थित सुरू आहेत, ते देखील बंद पाडायचे का? असाही सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय. त्यामुळं दुष्काळाच्या काळात माणसं जगवायला प्राधान्य द्यायचं की उद्योग जगवायला? असा यक्ष प्रश्न उभा ठाकलाय.