जालना : तीन बड्या नेत्यांचा जिल्हा म्हणजे जालना. पण जिल्हा परिषदेवर कोण सत्ता स्थापणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. भाजप घेणार का शिवसेनेची साथ की मग शिवसेना राष्ट्रवादीला घेणार सोबत यावरच जिल्हापरिषदेचे भवितव्य ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जालना जिल्हा परिषदेत 56 पैकी 22 जागा जिंकत भाजपा अध्यक्षपदाचा प्रबळ दावेदार बनलाय. पण त्यांना मॅजिक फिगर गाठण्यासाठी 7 जागांची गरज आहे आणि त्यासाठी शिवसेना किंवा राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागणार आहे. दोन अपक्ष सदस्य हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. त्यांचा कौल शिवसेनेच्या बाजुनं आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 16 झालंय. म्हणूनच सेनेनंही सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे.


जिल्हा परिषदेवर युती झाली तर भाजप अध्यक्षपदावर दावा ठोकणार. त्यामुळे सेना भाजपसोबत जायला तयार नाही. राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा पर्याय सेनेनं खुला ठेवलाय. अध्यक्षपद यावेळी खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळेचं मंत्री लोणीकरांचे चिरंजीव राहुल आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंची कन्या आशा पांडे या दोघांनाही अध्यक्षपदावर डोळा ठेऊनच मैदानात उतरवल्याचं खुलेआम बोललं जातंय. पण जाणकारांच्या मते भाजपपेक्षा शिवसेनेला राष्ट्रवादीचा पर्याय अधिक सुलभ आहे.


गेल्या 25 वर्षांत अडीच वर्षांचा अपवाद वगळता जिल्हा परिषदेवर युतीची सत्ता अबाधित राहिलीये. पण युती तुटल्यानं भाजप सेनेनं एकमेकांविरोधात शड्डु ठोकले. आता जालना जिल्हा परिषदेत अध्यक्षपद कुठल्या पक्षाकडे जातं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.