कैलास पुरी, पिंपरी-चिंचवड : गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सपाटा पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांनी लावला होता. मात्र वॉर्ड रचना जाहीर झाल्याने अनेकांची अडचण झालीय. त्यामुळे मोठ्या उत्साहाने भाजपमध्ये गेलेल्या अनेकांना तिकीट मिळणार नाही, असं दिसू लागल्याने त्यांना काय करावं असा प्रश्न पडलाय. तर दुसरीकडे भाजपलाही नव्या जुन्याचा समन्वय साधण्याच मोठं आव्हान असणार आहे!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्येप्रवेश केल्यानंतर त्यांच्या पाठराख्यांनी मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकांचं वारे वाहू लागल्यावर त्यात आणखी भरच पडली. मात्र, वॉर्ड रचना जाहीर झाल्यानंतर प्रवेश केलेल्या अनेकांनी प्रवेश का केला? असा प्रश्न पडला आहे. 


पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपला जिवंत ठेवण्याचं काम अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी केलं. मात्र राष्ट्र्वादीतल्या अनेकांना प्रवेश दिल्यामुळे त्यांना स्वत:ची उमेदवारी धोक्यात आल्याचं लक्षात आले आहे. त्यामुळं नवा आणि जुना संघर्ष तर सुरु झाला आहेच. अनेक प्रभागात इतर पक्षातून आलेले आणि मूळचे भाजप असे इच्छूक आमने-सामने आलेत आणि जवळपास ४० ठिकाणी हा संघर्ष निर्माण झाला आहे.


राष्ट्रवादीला सत्तेतून खाली खेचायचं असेल तर भाजपला तगडे उमेदवार हवेत. त्यामुळे भाजप राष्ट्रवादीचेच उमेदवार फोडत आहेत. मात्र त्यामुळे जुने भाजप कार्यकर्ते नाराज होत आहे. भाजपच्या सत्तेच्या मार्गात निवडणुकीआधीच अडथळे निर्माण होऊ लागलेत. यातून भाजप कसा मार्ग काढणार याचीच चर्चा सुरु आहे.