लातूर : महापालिकेसाठी ७० जागांसाठी ४०७ उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली. यात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. गतवर्षी येथे भाजपची एकही जागा नव्हती. त्यामुळे शून्यातून सत्तेत भाजप बसला आहे. तर दुसरीकडे स्टार प्रचारक म्हणून अभिनेता रितेश देशमुख प्रचारात उतरला होता. मात्र, याचा प्रभाव मतदारांवर पडलेला नाही.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लातूरमध्ये प्रचारसभा घेतली होती. लातूर हा काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा गड मानला जातो. काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. तर पालकमंत्री व भाजप नेते संभाजी निलंगेकर-पाटील या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात आमदार अमित देशमुख नापास झालेत. 


लातूरमध्ये गेल्या वेळच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान कमी झाले होते. तसेच भाजपला येथे एकही जागा नव्हती. मात्र, भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला चारीमुंड्या चीत केले. त्यामुळे काँग्रेसला येथे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. भाजपने ३६ पेक्षा जास्त जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली आहे. याआधी काँग्रेसकडे ५० जागा होत्या. सत्ताधारी काँग्रेसला आपला गड राखता आला नसल्याने आमदार अमित देशमुख यांच्यावरील नाराजी लोकांनी मतदानातून दाखवून दिल्याची चर्चा आहे.


आताचे पक्षीय बलाबल पाहा


लातूरशहर महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून ३८ जागांवर भाजप, ३१ जागांवर काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०१ जागा मिळाली  आहे. या ठिकाणी शिवसेनेला खातेही खोलता आलेले नाही. याआधी शिवसेनेला ६ जागा येथे मिळाल्या होत्या.