पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी. विद्येचं माहेरघर, अशी विशेषणे असलेल्या पुण्याला आता एक दूषण देखील जोडले गेले आहे. काळा पैसा बाळगणाऱ्यांमध्ये पुण्याचा देशात सहावा क्रमांक लागला आहे. आयकर विभागाच्या इन्कम टॅक्स डिक्लेरेशन स्किममध्ये ही माहिती पुढे आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयकर विभागाने जून 2016 ला काळा पैसा जाहीर करण्यासाठी इन्कम डिक्लेरेशन स्किमची घोषणा केली. ही योजना चार दिवसांनी म्हणजे 30 सप्टेंबरला संपत आहे. या योजनेअंर्तगत देशात सर्वाधिक काळा पैसा मुंबईकरांनी जाहीर केला आहे. तर, काळा पैसा बाळगणाऱ्यांमध्ये पुणे सहाव्या क्रमांकावर आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे संचालक आर. सी. मिश्रा यांनी  ही माहीती दिली.


योजना संपणार असल्याने 30 सप्टेंबरला रात्री बारा पर्यंत आयकर विभागाची कार्यालंय खुली राहणार आहेत... काळा पैसा जाहीर करण्याची ही योजना चार दिवसांनी संपणार असली तरी, या चार दिवसात पुण्याचा क्रमांक आणखी वर जाण्याची शक्यता आहे. 


काळा पैसा जाहीर करण्याच्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहेच. पण अधिक लोकांनी आपला काळा पैसा जाहीर करावा यासाठी ही योजना अधिक आकर्षक करण्यात आली आहे. जाहीर केलेल्या काळ्या पैशा पैकी 45 टक्के रक्कम सरकार जमा होणार आहे. 


मात्र, ही ४५ टक्के रक्कम भरण्यासाठी वर्षभराची मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच, हे पैसे वर्षभर वापरायला मिळणार आहेत. त्यामुळं काळ्या पैशापैकी जरी ४५ टक्के रक्कम भरावी लागणार असली तरी, एक वर्षाची मुदत पाहता प्रत्यक्षात ४० टक्केच रक्कम सरकारकडे भरावी लागणार आहे. बरं, परत गोपनीयतेची पूर्ण हमी आयकर विभागाने दिली आहे. 
  
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या योजनेला आणखी  मुदतवाढ दिली जाईल या आशेवर कुणी राहू नये असा सल्ला आयकर विभागाने दिला आहे.  आपली माहिती गुप्त राहील कि नाही अशी शंका कोणाला वाटत असेल तर, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून आयकर विभागाच्या बंगलोर येथील सीपीसी केंद्रात थेट माहिती देण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. त्यामुळं पुण्यातील व्यक्ती बंगलोरच्या केंद्रात ऑनलाईन काळ्या पैशाची माहिती देऊ शकेल आणि पुण्यातील आयकर अधिकाऱ्यांना देखील त्याची माहिती होणार नाही.


आयकर विभागाने आता काळ्या पैसा जाहीर करणाऱ्या शहरांचे रँकिंग आता जाहीर केलं असलं तरी, ही योजना संपल्यावर देशभरातून किती काळा पैसा या योजनेअंतर्गत जाहीर झाला ते देखील कळणार आहे.