विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : लातूरमध्ये हुंडा देण्यास पैसै नाही म्हणून आत्महत्या करणा-या शितल वायाळची बातमी जुनी होत नाहीच तोच बहिणीच्या लग्नाच्या खर्चाच्या चिंतेनं भावानं आत्महत्या केलीय. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या भादली गावात ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरातल्या एकुलत्या एक कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळे घरावर शोककळा पसरलीय. 24 वर्षीय बाबासाहेब बागुलच्या वडिलांचं चार वर्षांपूर्वी निधन झालं. वडिलांच्या पश्चात चार बहिणींची जबाबदारी त्याच्यावरच पडली. तिघींचं कसेबसे लग्न झाले. धाकटी बहीण सोनालीचं 16 एप्रिलला लग्न होतं.


लग्नासाठी  बाबासाहेबनं ओळखीच्यांकडून उसनवार पैसे मागितले होते. परंतु आज उद्या म्हणत लग्नाच्या ऐन वेळेतच पैशाला नकार मिळाला. त्यात हफ्त्यावर घेतलेल्या दुचाकीच्या कर्जाचा ससेमिराही मागे लागला होता. लग्नासाठी बाबासाहेबांच्या दोन्ही मेव्हण्यांनी मदत करायची तयारी ठेवली होती. मात्र, आपल्याकडून बहिणीच्या लग्नासाठी काहीच सोय होत नाही, या विवंचनेत लग्नाच्या 4 दिवस आधीच या तरुणानं आपली जीवनयात्रा संपवली. 


बाबासाहेब जवळ अवघी दोन एकर शेतजमीन होती. पण त्यात देखील काहीच पिकत नसल्यानं हातउसने घेतलेले पैसे परत करण्याची चिंता बाबासाहेबला सतावत होती.


गावातलं घर पडल्यानं समाज मंदिरात राहण्याची वेळ आल्यानं तो चिंतेत होता.त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचं बोललं जातय. बाबासाहेब बागुलला सहा महिन्यांची मुलगी देखील आहे.  


बाबासाहेब बागुलची हलाखीची परिस्थिती होती हे मान्य मात्र पाहुण्यांकडून मदतीचा हात पुढे होत असताना या संघर्षमय परिस्थितीतून वाट काढत पुढे जाण्यापेक्षा कुटुंबाची जबाबदारी वा-यावर टाकून जीवन संपवणं योग्य आहे का याचा विचार होणे गरजेचे आहे.