महिलांच्या प्रतिकाराला घाबरून दरोडेखोरांचा पळ
नांदेडमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांत महिलांनीच दरोडेखोरांचा सामना करुन त्यांना हुसकावून लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
नांदेड : नांदेडमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांत महिलांनीच दरोडेखोरांचा सामना करुन त्यांना हुसकावून लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रविवार 26 तारखेच्या मध्यरात्री भाग्यनगर पोलीस ठाणे भागातल्या या दोन घटना आहेत. त्यापैकी पहिली घटना सिद्धिविनायक नगरमध्ये घडली.
महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी के आर शर्मा यांच्या घरी अज्ञात पाच आरोपींनी दरोडा टाकला.त्यावेळी शर्मा यांच्या पत्नी नीना शर्मा यांनी धाडसानं लोखंडी सळीनं या दरोडेखोरांचा सामना करत, त्यांना पिटाळून लावलं. तर दुसरी घटना त्याच रात्री भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीतल्या बालाजी नगरात घडली.
यात घरात एकट्या असलेल्या अनिता खंदारे यांच्या घरात घुसण्याचा दरोडेखोरांनी प्रयत्न केला. मात्र वेळीच जाग्या झालेल्या अनिता खंदारे यांनी मिरचीची पूड दरोडेखोरांच्या डोळ्यात टाकून त्यांना जेरीस आणलं.