दापोली : फाजील अतिउत्साह कसा जिवावर बेतू शकतो याचं उदाहरण, रत्नागिरीतल्या दापोलीत शनिवारी पाहायला मिळालं. शनिवार रविवारची सुट्टी आणि त्यात कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे दापोलीतल्या कर्दे समुद्रकिना-यावर रात्री पर्यटकांची गर्दी होती. त्यावेळी एका गाडीतून काही अतिउत्साही पर्यटक थेट कर्दे समुद्रकिना-यावरच आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किना-यावर गाडी नेऊ नका, असं त्यांना स्थानिकांनी सांगितलं, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी आपली गाडी थेट समुद्रात नेली. समुद्राला भरती असल्यामुळे, त्यांची गाडी समुद्रात खेचली गेली. आपल्यामध्येच मश्गुल राहत आणि इतरांची पर्वा न करता, स्वतःपुरताच कथित आनंद लुटू पाहणा-या या गाडीतल्यांना एव्हाना प्रसंगाचं गांभीर्य कळलं होतं. त्यामुळे त्यांची भीतीनं पुरती गाळण उडाली.


कशाबशा गाडीतून उड्या टाकून त्यांनी आपला जीव वाचवला. मात्र त्यांची गाडी समुद्रानं ओढून नेली होती. त्यानंतर आज सकाळी स्थानिकांच्या मदतीनं ही गाडी बाहेर काढण्यात आली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मुरुड समुद्रकिनारी एका पर्यटकाचा अशाच अतिउत्साहामुळे मृत्यू झाला होता. म्हणूनच प्रत्येकानं फाजील उत्साह टाळणं गरजेचं आहे.