उत्पादन शुल्क कार्यालयातून अडीच लाखांची दारूची चोरी
दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात चोरट्यांची कमाल केली आहे. चोरट्यांनी चक्क दारूवर हात साफ केलाय आणि तोही वरोरा येथील उत्पादन शुल्क कार्यालयातून.
आशीष अम्बाडे, झी मीडिया, वरोरा : दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात चोरट्यांची कमाल केली आहे. चोरट्यांनी चक्क दारूवर हात साफ केलाय आणि तोही वरोरा येथील उत्पादन शुल्क कार्यालयातून.
जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे उत्पादन शुल्क विभाग अवैध दारू जप्त करून त्यांच्या मालखान्यात जमा करते मात्र या चोरट्यांनी मालखान्याचे कुलूप फोडून २ लाख ५५ हजारांची दारू लंपास केली.
मालखान्याचे प्रभारी अधिकारी हे २८ तारखेपासून रजेवर होते आणि त्यानंतर ही चोरी झाली असावी असा अंदाज आहे . या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक निरीक्षक दशरथ आवारी यांनी वरोरा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे.
फिर्यादी प्रमाणे देशी दारूच्या १८०मिलीच्या ७२० बॉटल्स आणि ९०मिलीच्या ३६५९ बॉटल्स चोरीला गेल्या असून त्यांची किंमत अंदाजे २ लाख ५५ हजार आहे. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.