पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडी परिसरात काल रात्री भंगाराच्या २५  दुकानांना आग लागली. तबल १० तासानंतर ती आटोक्यात आली. आगीमुळे पालिका प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दाही समोर आलाय. कुदळवाडी परिसर हा भंगार दुकानासाठीच प्रसिद्ध आहे. पण या ठिकाणची बहुतांश दुकान बेकायदा आहेत.  इथे पोलीस आणि पालिका अधिका-यांशी अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याचा आरोप केला जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुदळवाडी... क्लीन सिटी, बेस्ट सिटी असलेल्या पिंपरी चिंचवड ची दुसरी बाजू.  कशी ही कोठे ही उभारण्यात आलेली भंगाराची दुकान. परिसरात जायला धड रस्तेही नाही... या विभागात कोणतं नियोजनच नाही. याच परिसरातल्या तब्बल २५ भंगार दुकानांना आग लागली आणि कुदळवाडीचं वास्तव समोर आलं. 


जणू इथे कोणते नियमच लागू नाहीत. पोलिस अधिकारी असतील किंवा पालिका प्रशासन इथल्या व्यावसायिकांवर कोणीही कारवाई करत नाही. हे व्यावसायिक पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना हफ्ते देत असल्यामुळच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक  नगरसेवक राहुल जाधव यांनी केला आहे.


पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यानंतर बोलू असं म्हटलंय. तर पालिका प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. एकीकडे शहराला सुनियोजित विकास, स्वच्छता यासाठी पुरस्कार मिळालाय, पण या पुरस्कार देणाऱ्यांनी पिंपरी चिंचवडची अजून कुदळवाडी पाहिलेली नाही हे नक्की.