CNG वर चालणाऱ्या आता टू व्हिलर...
आता पुण्यातील दुचाकीही हरित उर्जेवर धावणार आहेत. शहरातील प्रदुषणाला आळा घालण्यामध्ये उपयुक्त ठरू शकतील अशा सीएनजी वर चालणाऱ्या गाड्यांचं लोकार्पण आज झालं. दिल्लीनानंतर पहिल्यांदा पुण्यातच हा प्रयोग राबवण्यात येत आहे.
अरूण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे : आता पुण्यातील दुचाकीही हरित उर्जेवर धावणार आहेत. शहरातील प्रदुषणाला आळा घालण्यामध्ये उपयुक्त ठरू शकतील अशा सीएनजी वर चालणाऱ्या गाड्यांचं लोकार्पण आज झालं. दिल्लीनानंतर पहिल्यांदा पुण्यातच हा प्रयोग राबवण्यात येत आहे.
प्रदूषण ही पुण्यातील गंभीर समस्या आहे. पुण्यातील वाहनांची संख्या हे त्यामागील महत्वाचं कारण आहे. शहरात सुमारे ५० लाख वाहनं आहेत. त्यापैकी दुचाकींची संख्या २५ लाखांवर आहे. या दुचाकी प्रामुख्यानं पेट्रोलवर चालतात. त्यामुळे त्यांच्यापासून होणारं कार्बन मोनॉक्साईड तसेच हायड्रोकार्बनचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर आहे. या पार्शवभूमीवर 'आय टुक' या कंपनीतर्फे पुण्यातील दुचाकींना सीएनजी किट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सीएनजीला स्वच्छ तसेच हरित इंधन मानलं जात असल्यानं प्रादेशिक परिवहन विभागाकडून देखील या प्रयोगाला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
सीएनजी किटची किंमत सुमारे १६ हजार रुपये असून सध्या मोपेड प्रकारच्या दुचाकीमध्ये ती बसवण्यात आलीय. सीएनजी वरील दुचाकी २ किलो इंधनामध्ये १२० किलोमीटर्स अंतर धावणार आहे. सीएनजीचे सध्याचे दर ४४ रुपये किलो आहेत. त्यामुळे प्रदूषण टाळण्याबरोबरच ही गाडी वापरणं ग्राहकांसाठी आर्थिक दृष्ट्या स्वस्त पडणार आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यलयासोरील सीएनजी पंपावर या प्रयोगिक तत्त्वावरील गाड्यांचं लोकार्पण झालं. पुण्यामध्ये सीएनजीवर धावणाऱ्या बसेस, कार्स तसेच रिक्षा मोठ्या प्रमाणावर आहेत. आता त्यात दुचाकींची भर पडणार असल्यानं शहरात एका नव्या हरित पर्वाला सुरवात होणार आहे.