पुणे : सांस्कृतिक राजधानी पुण्यातल्या कर्वेनगर भागात आता एक आगळं वेगळं संग्रहालय पाहायला मिळणार आहे... सामान्यांच्या खिशाला सहज परवडणाऱ्या आणि एकेकाळी वाहतुकीचं महत्त्वाचं साधन ठरलेल्या दुचाकींचं... अर्थातच सायकलींचं.... 
 
विक्रम पेंडसे या अवलियाच्या कल्पनेतून हे सायकलींचं संग्रहालय साकारलंय. आपल्या सगळ्यांच्याच आठवणीत सायकल अगदी घट्ट रुजलेली आहे... लहानपणी आजोबांनी हौसेनं घेऊन दिलेली तीन चाकी सायकल, कॉलेजमध्ये जाण्यासाठी आई-बाबांनी घेऊन दिलेली सायकल आणि त्या सायकलच्या सोबतीने आपण केलेल्या अनेक सहली...


तीन चाकी सायकल

समाज जीवनाचं धावतं चित्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतिहास म्हणजे केवळ राजे, त्यांचे सरदार, शस्त्रे, नाणी आणि लढाया इतकाच नसतो तर सामान्य लोक, त्यांचे दैनंदिन जीवन, त्यांच्या रोजच्या वापरातील वस्तू हा सुद्धा त्या त्या काळातील समाजाचा इतिहासच असतो. समाजाचा इतिहास हा बहुतांश वेळा दुर्लक्षितच असतो. विक्रम पेंडसेंचे हे संग्रहालय म्हणजे गेल्या शतकातल्या समाज जीवनाचे धावते चित्रच आपल्यासमोर उभे करण्याचा एक प्रयत्न आहे.


विक्रम पेंडसे यांना लहानपणापासूनच सायकल व मोटरसायकलीचे अप्रूप होते. 22 वर्षांपूर्वी दुसऱ्या महायुद्धात वापरली गेलेली BSA Paratrooper ही सायकल हाती आल्यानंतर सुरु झालेली ही वाटचाल आज एका संग्रहालयात परिवर्तित झालेली आहे. जीर्ण अवस्थेत असणाऱ्या अनेक सायकली मूळ रुपात परत आणण्यासाठी विक्रम यांना साथ मिळाली ती श्री. पांडुरंग गायकवाड यांची... गायकवाड हे सुद्धा सायकलप्रेमी आणि सायकलपटू... गायकवाडांनी दक्षिण आशियाई सायकलींग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले असून सलग १५ वर्षे पुणे-मुंबई सायकल स्पर्धेत भाग घेतला आहे. गायकवाडांच्या अथक प्रयत्नातून या संग्रहातील प्रत्येक सायकल आजही चालत्या अवस्थेत आहे.


एकेकाळचा... सायकलचा दिवा

तीन मजली संग्रहालय


सायकली जमवता जमवता विक्रम यांच्या संग्रहात लहान मुलांच्या तीन चाकी सायकल, सायकलींचे विविध सुट्टे भाग, पेडल कार्स, कुलूपे, घड्याळे, रेडिओ, ग्रामोफोन, रेकॉर्ड प्लेअर, टाईप रायटर, टेलिफोन, विविध आकारांच्या आणि रंगाच्या काचेच्या बाटल्या, अडकित्ते आणि पानाचे डबे जुनी वजने व मापे आणि अनेक घरगुती वस्तू यांचादेखील समावेश झाला आहे. हा संग्रह सर्वांसाठी खुला असावा या हेतूने विक्रम यांनी राहत्या घरातच तीन मजली संग्रहालय उभारलंय... या अनोख्या संग्रहालयाचं उदघाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते गुरुवारी, १८ मे रोजी सायंकाळी ७.०० वाजता होणार आहे.