विशाल करोळे, औरंगाबाद : दौलतजादा करून लग्नातला श्रीमंती थाट अनेकदा आपण पाहिलाय. मात्र आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक आगळ्या-वेगळ्या लग्नाची गोष्ट. या लग्नात सुद्धा दौलत आहे मात्र त्याला जोड आहे एका अनोख्य़ा दातृत्वाची.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खऱ तर श्रेया मुनोद हीचं लग्न सुद्धा अगदी धुमधडाक्यात होणार होतं. दोन्ही कुटुंबिय सधन असल्याने कशाची कमी नव्हती. मात्र नातेवाईक प्रशांत बंब यांनी एक नवा विचार मांडला. आणि त्यातून 108 घर बेघरांना देण्याची ही संकल्पना पुढं आली. आणि पाहता पाहता 90 घर उभी राहिली.


माझ्या संसारासोबत आणखी 90 संसार फुलणार आहे आणि ही संख्या पुढं वाढतच जाणार असल्यानं समाधान मिळत असल्याच श्रेया सांगते.


वन रुम किचनची 90 घरे पूर्ण तयार झाली आहेत. तर इतर घरांचे काम सुरु आहे. या कॉलनीत रस्ते तयार झाले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी खास आरओ प्लान्ट सुद्धा लावण्यात आला आहे. 


यातील काही घर गरीब घरातील शिक्षण घेणा-या मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी लायब्ररी, खुल रंगमंचं सुद्धा तयार करण्यात आलंय. ही कॉलनी म्हणजे कधीही घर न होणा-या समाजातील एका घटकासाठी स्वप्नपूर्ती आहे.


अनेक धनदाडग्यांची, नेते मंडळींच्या मुलांची मोठी लग्न या महाराष्ट्रानं पाहिलीत. मात्र लग्नातून असाही आदर्श पाहण्याची ही पहिली वेळ आहे.