विकास भदाणे, जळगाव : केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयानंतर कॅशलेस व्यवहार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'यूपीआय' अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस अॅपमधील त्रुटींचा गैरफायदा घेत जळगावातील १३ जणांनी बँक ऑफ महाराष्ट्रवर ४९ लाखांचा डिजिटल दरोडा घातलाय. बँकेच्या पूल अकाउंटमधील वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे परस्पर वळवून घेतले. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई, औरंगाबाद, नाशिकनंतर कॅशलेस व्यवहारातील त्रुटींचं लोन जळगावपर्यंत पोहचलंय. जळगावातील 'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्येही हा प्रकार घडलाय. यूपीआय अॅपमध्ये मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून खात्यावर पैसे नसताना एका दिवसाला लाख रुपयांपर्यंत मागणी करण्यात येत होती. याचा गैरफायदा घेत इथल्या जितेंद्र मारुती रिंधे यानं मेहरूण भागात राहणाऱ्या सात-जणांच्या नावाने खाते सुरू केले. काहींचे बंद पडलेल्या खात्यांचाही वापर करून 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या पूल अकाउंटमधील ४८ लाख ९४ हजार ४८२ रुपये परस्पर वळते करून घेतले. पैसे विड्रॉल झाल्यामुळे बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली. 


सुरुवातीला बँकेने आपल्या पातळीवर तपास करणे सुरू केले. तपासाअंती त्यांना १३ जणांच्या खात्यांवर गैरप्रकारे पैसे जमा झाल्याचे तसेच संबंधितांनी जमा झालेले पैसे खात्यातून काढून घेतल्याचे लक्षात आल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांत फिर्याद दिलीय.  


'बिट कॉइन' नावाच्या व्यवसायाच्या माध्यमातून संशयिताने ६ खातेदारांच्या पासबुक, रजिस्टर नंबर मिळवून लाखो रुपयांची फसवणूक केलीय. याप्रकरणी शहर पोलिसांत १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.


एकाच बँकेत अशा प्रकारे ३३८६ ट्रान्झॅक्शन झालेत. आता एकाच प्रकरणाची फिर्याद दाखल करण्यात आलीय. त्यामुळे उरलेल्या प्रकरणात बँकेच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा डिजिटल दरोडा घातला गेल्याची शक्यता आहे.