पुणे : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांसह सत्तेतील शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली असताना डॅमेज कंट्रोलसाठी भाजपाची चार दिवसीय शिवार संवाद यात्रा सुरु होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाचे खासदार, आमदार मंत्र्यांपासून नगरसेवक, पंचायत समिती ते ग्रामपंचायत सदस्य, हे गावांमध्ये जाऊन शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. 


सकाळी दोन गावं आणि संध्याकाळी दोन गावे असे चार दिवस संवाद साधत राज्यातील संपूर्ण ग्रामीण भाग पालथा घालण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे. या कार्यक्रमात राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय शेतक-यांना सांगितले जाणार आहेत. शेतक-यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या जातील. तसंच जलयुक्त शिवार योजनेची कामं सुरु असलेल्या ठिकाणी श्रमदानही करण्यात येणार आहे. 


पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात आणि प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधतील. 


पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, बीडमध्ये पंकजा मुंडे आणि कोकणातील रत्नागिरीत शिक्षणमंत्री विनोद तावडे तर मालवणमध्ये आशीष शेलार शेतकऱ्यांशी संवाद साधतील.