उस्मानाबाद : जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर मातेलाही त्यांच्या नातेवाईकांसोबत वॉर्ड बाहेर काढल्याने त्या महिलेची रुग्णालयाच्या आवारात, उघडयावर प्रसूती झाली. तसा गंभीर आरोप होत आहे. तर दुसरीकडे अज्ञानापोटी, उपचार नाकारून स्वतःच गरोदर माता रुग्णालया बाहेर गेल्यामुळे असा दुर्दैवी प्रकार घडल्याचे रुग्णालय प्रशासन सांगत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उस्मानाबाद तालुक्यातल्या गोपाळवाडी पारधी वस्तीवरील पपिता पवार या महिलेला, तिचे नातेवाईक प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात घेऊन आले होते. तिची रक्त तपासणीही करण्यात आली. दुपारी या महिलेची रुग्णालयाच्या एका कोपऱ्यात प्रसुती झाली. या प्रसुतीच्या वेळी दवाखान्यातील नर्स आणि कर्मचा-यांनीच मदत केली.


मात्र, रुग्णालयातील नर्सनी संबंधित गरोदर मातेला प्रसूती कक्षाच्या बाहेर काढल्यामुळेच उघड्यावर प्रसूती झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. उघडयावरील प्रसूतीनंतर रुग्णालयातील नर्स आणि कर्मचाऱ्यांनी त्या नवजात बालकाला डोस देण्यासाठी दवाखान्यात नेले.


मात्र अशिक्षित आणि अंधश्रद्धाळू नातेवाईकांनी रुग्णालयावर अविश्वास दाखवत बालकाला आणि तिच्या आईला रिक्षातून घरी नेल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. याबाबत पोलिसांनाही कळवले असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. 



नाहक गोंधळामुळं, पहिल्यांदाच प्रसूतीसाठी दवाखान्यात आलेल्या आदिवासी पारधी समाजातील अशिक्षित गरोदर माता आणि तिच्या नवजात बालकांवर उपचार झालेच नाहीत. याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.