मुंबई : सामान्य नागरिक पैशांसाठी बँकांसमोर रांगा लावत असतानाच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा खासदार मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या लग्नाच्या डामडौलानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.


अर्धा किलोची आमंत्रणपत्रिका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१७ नोव्हेंबर रोजी श्रीकांत शिंदे यांचा विवाहसोहळा पार पडला. या विवाहासाठी लग्नपत्रिकाही तितकीच खास होती. तब्बल अर्धा किलो वजनाची कॉफीटेबल बुकप्रमाणे दिसणारी  ही पत्रिका हे लग्न किती भव्य दिव्य होणार त्याचीच झलक देत होती. विशेष म्हणजे, शिंदे यांचा साखरपुडा समारंभही शाही थाटात पार पडला होता.


आमंत्रणपत्रिका

शाही विवाहसोहळा...


ठाण्यातल्या कॅडबरी जंक्शन भागातील रेमण्ड फॅक्टरीच्या पटांगणात श्रीकांत शिंदे यांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. तसंच अनेक आमदार, खासदार आणि वरिष्ठ अधिकारीही या लग्नासाठी उपस्थित झाले होते.


नागरिकांची अडचण...


लग्नासाठी २५ हजार निमंत्रितांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांना वेगवेगळ्या वेळाही ठरवून देण्यात आल्या होत्या. खुल्या पटांगणात भला मोठा मंडप लग्नासाठी उभारण्यात आला होता. परंतु, आमंत्रितांचं आगमन सुरू झालं आणि विवाहस्थळाच्या बाहेर गाड्यांचा एकच ताफा दिसू लागला. गाड्यांची संख्या वाढल्यानं बाहेरच्या रस्त्यावर एकच गर्दी दिसू लागली. त्याचा चांगलाच फटका ठाणेकरांना बसला.