नागपूरमध्ये भरदिवसा वायूसेनेच्या अधिकाऱ्याचे १६ लाख लुबाडले
नागपूरच्या वाडी भागात भर दिवसा निवृत्त वायूसेना अधिकारी जगमलसिंग यादव यांच्यावर हल्ला करून त्याचे १६ लाख रूपये लुटल्याची खळबळजनक घटना घडलीये.
नागपूर : नागपूरच्या वाडी भागात भर दिवसा निवृत्त वायूसेना अधिकारी जगमलसिंग यादव यांच्यावर हल्ला करून त्याचे १६ लाख रूपये लुटल्याची खळबळजनक घटना घडलीये.
वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात असलेल्या स्टेट बँकेच्या समोर काल सकाळी ही घटना घडलीय. पैसे जमा करण्यासाठी बँकेत आलेल्या यादव यांच्यावर ३ आरोपींनी तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करून त्यांना जखमी केलं आणि पैशाने भरलेली बॅग पळवली.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे यादव यांना बचाव करण्याकरता जराही अवधी मिळाला नाही आणि काही कळायच्या आता तिघे तरुण आपल्या पल्सर बाईकने बॅग घेऊन पसार झाले. तीनपैकी एका आरोपीने हेल्मेट घातले होते तर इतर दोघांनी कापडाने आपला चेहरा झाकला होता.
जखमेने विव्हळत असलेल्या यादव यांच्या ओरडण्याने बँकेतील कर्मचारी बाहेर आले आणि घटनेची तक्रार पोलिसांना देण्यात आली.