संतोष लोखंडे, बुलडाणा : आपल्या घरी शौचालय बांधा मी उघडयावर शौचाला जाणार नाही असा हट्ट, तिसरीत शिकणाऱ्या बुलढाण्यातल्या एका चिमुकलीने आपल्या पालकांकडे केला. मात्र केंद्र आणि राज्य सरकारचं हक्काचं अनुदान काही त्यांना त्यासाठी मिळू शकलं नाही. त्यामुळे अठराविश्व दारिद्र्य असलेल्या या कुटुंबाला दागिने गहाण ठेवावे लागलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलढाणा जिल्ह्यामधल्या मोताळा तालुक्यातल्या चिंचपूर इथलं विष्णू धोरण आणि त्यांचं कुटुंब, मोलमजुरी करुन संसार चालवतं. विष्णू धोरण यांची नयन ही मुलगी गावातल्याच जिल्हा परिषद शाळेत तिसऱ्या वर्गात शिकते. तिच्या वर्गात उघड्यावर शौचाला जाणं योग्य नाही ही माहिती दिली गेली होती. त्यानंतर तिनही घरीच शौचालय बांधण्याचा हट्ट आपल्या आई-वडिलांकडे धरला. यावर हातावर पोट असलेल्या या कुटुंबानं अंगावरचे दागिने बँकेत गहाण ठेऊन शौचालय बांधकामाला सुरुवात केली. 


आजीने आपल्या हातातील २५० ग्रॅम चांदीच्या पाटल्या आणि आईने आपल्या गळ्यातील सौभाग्याचं लेन असलेली ५ ग्रॅम सोन्याची पोत बँकेत गहाण ठेवण्याचं निर्णय घेतला आणि त्यांनी बुलढाणा अर्बनमध्ये आपले दागिने गहाण ठेवले. त्यापोटी त्यांना ९५०० रुपये मिळाले आणि त्यांनी शौचालय बांधकामास सुरुवात केली.


शौचालय बांधायला किमान १६ ते १७ हजार रुपये खर्च येतो. मात्र, धोरण कुटुंबाला दागिने गहाण ठेवून फक्त साडे नऊ हजार रुपयेच मिळालेत. तरीही हिंमत न हरता मोलमजुरी करून पैसे जमवून शौचालय पूर्ण बांधण्याचा निर्धारच धोरण कुटुंबानं केलाय. 


शौचालय बांधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रति लाभार्थी १२ हजार रुपये अनुदान देतं. मात्र, काही जाचक अटी, तसंच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे अनेक लाभार्थी यापासून वंचित राहत असल्याचं चित्रंच या घटनेतून स्पष्ट दिसून येतं.